पदवी परीक्षांबाबत राज्यपालांशी सकारात्मक चर्चा: उदय सामंत

पदवी परीक्षांच्या आयोजनासंदर्भातील चर्चा करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी बुधवारी २ सप्टेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी राज्यपाल देखील सकारात्मक आहेत, अशी माहिती सामंत यांनी या भेटीनंतर माध्यमांना दिली. सामंत म्हणाले, 'कुलगुरू जी भूमिका मांडतील, त्यानुसार पुढे जावे, असे सांगत राज्यपालांनी देखील सकारात्मक भूमिका मांडली. या भेटीत चांगली चर्चा झाली.' सकाळी ११ वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांना पदवी परीक्षांसंदर्भातील राज्य सरकार करत असलेल्या कार्यवाहीची माहिती सामंत यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याबाबतचे निर्देश दिल्यानंतर त्यास बांधील राहून राज्यात रद्द न करता विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रापर्यंत जावे लागणार नाही, हेही यापूर्वी उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. राज्यपालही या मुद्द्यावर सकारात्मक आहेत, विद्यार्थ्यांना फार त्रास न होता परीक्षा घेतल्या जायला हव्यात, असेच राज्यपालांचेही मत असल्याचे सामंत यांनी सांगितले. दरम्यान, आज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या एकूण तीन बैठका होणार आहेत. त्यानंतर कुलगुरू गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. म्हणजेच पदवी परीक्षा कधी आणि कशा पद्धतीने घेण्यात येतील याबाबतची घोषणा गुरुवारी ३ सप्टेंबर रोजी राज्यपालांच्या भेटीनंतरच केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली समिती आज २ सप्टेंबर रोजी सायंकाळी पुन्हा बैठक होणार आहे. यात समिती आपल्या अंतिम शिफारशींचा दुसरा प्रस्ताव उदय सामंत यांना सादर करणार आहे. शिवाय आपत्कालीन व्यवस्थापन समितीचीदेखील आज बैठक होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवी परीक्षा घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र राज्यातील मुंबई, पुणे सह अनेक विद्यापीठांनी परीक्षा आयोजित करण्यासाठी मुदतवाढीची मागणी केली आहे. परीक्षांच्या आयोजनासाठी काही विद्यापीठांनी ऑक्टोबर अखेरपर्यंतचा तर काहींनी १० नोव्हेंबरपर्यंतचा वेळ मागितला आहे. उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा हेही सामंत यांच्यासोबत राजभवनावरील बैठकीच्या वेळी उपस्थित होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31QA1Cd
via IFTTT

Post a Comment

0 Comments