शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजपासून 'विद्यापीठ बंद' आंदोलन

University Non-Teaching Staff : प्रलंबित मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन करणारे अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या चर्चेतून कोणताही निर्णय होत नसल्याने, आज गुरुवारी १ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत राज्यातील विद्यापीठांमध्ये करण्यात येत आहे. विद्यापीठातील सर्व कर्मचारी मुख्य इमारतीच्या समोर ठिय्या आंदोलन करीत असून, घोषणा देत आहेत. राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे आंदोलन सुरू झाल्याने, अंतिम वर्ष परीक्षांचे नियोजन आणखी कोलमडणार आहे. सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना जाहीर करुन, तो तातडीने लागू करावा, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा, पदोन्नतीबाबत तत्काळ निर्णय घ्यावा आदी प्रमुख मागण्यांसाठी राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. त्याचा परिणाम म्हणजे विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षांचे नियोजन करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आयोजित बैठकीत उदय सामंत यांनी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या सदस्यांशी चर्चा करुन, आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, लेखी निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून तयार करण्यात आलेल्या इतिवृत्तात मागण्यांच्या कार्यवाहीच्या कालावधी व्यतिरिक्त कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आज गुरुवारपासून विद्यापीठ बंद आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असून, त्याअंतर्गत कोणतेही शैक्षणिक कामकाज करण्यात येणार नाही. कार्यालये सुद्धा बंद राहतील, अशी माहिती समितीच्या वतीने डॉ. सुनील धिवार यांनी दिली. सरकारच्या नाकर्तेपणामुळे परीक्षा लांबणीवर : अभाविप शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी रास्त असलेल्या मागण्यांना पाठिंबा दिला; तसेच परीक्षेचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी विनंती केली. सरकार हा विषय असंवेदनशील पद्धतीने हाताळत असल्याने, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व प्राजक्त तनपुरे यांनी कर्मचाऱ्याच्या रास्त असलेल्या मागण्या त्वरित मान्य करून संप मिटवा, अशी मागणी प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे व दयानंद शिंदे यांनी केली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ETrje0
via IFTTT

Post a Comment

0 Comments