NEET-JEE: राज्यांची फेरविचार याचिका SC ने फेटाळली

JEE Main And NEET Exams 2020: सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकवार जेईई, नीट परीक्षांना हिरवा कंदिल दाखवला आहे. देशातील सहा राज्यांची या परीक्षांसंदर्भातील फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळली आहे. जेईई मेन परीक्षा १ सप्टेंबर २०२० पासून सुरू झाली असून ६ सप्टेंबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. नीट यूजी परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. जेईई आणि नीट यूजी परीक्षा करोना काळातही आरोग्यासंबंधी सुरक्षिततेचे नियम पाळून घेतल्या जाव्यात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १७ ऑगस्ट रोजी दिला होता. या निर्णयाविरोधात देशातील सहा राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळली. न्या. अशोक भूषण, न्या. बी. आर. गवई आणि न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली. बिगर भाजप सरकार असलेल्या ६ राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. यात सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे की न्यायालयाने वरील आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांमध्ये मोलोय घटक (मंत्री, प. बंगाल), डॉ. रामेश्वर उरांव (मंत्री, झारखंड), डॉ. रघु शर्मा (आरोग्यमंत्री, राजस्थान), अमरजीत भगत (मंत्री, छत्तीसगड), बलबीर सिंह सिद्धू, आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा समावेश होता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/322ANMR
via IFTTT

Post a Comment

0 Comments