सैनिकी शाळांमध्ये देखील आता मिळणार ओबीसींना आरक्षण

Sainik School : सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी एक चांगली बातमी आहे. आता सैनिकी शाळांमध्ये देखील इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षण लागू होईल. भारत सरकारचे संरक्षण सचिव अजय कुमार यांनी यासंबंधातील घोषणा केली आहे. अजय कुमार यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे की सैनिक शाळांमध्ये देखील ओबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षणाचा लाक्ष मिळणार आहे. शैक्षणिक सत्र २०२१-२२ पासून हे आरक्षण लागू होणार आहे. यासंबंधी सर्व सैनिकी शाळांच्या मुख्याध्यापकांना आदेशाचे परिपत्रक देखील पाठवण्यात आले आहे. असे असतील आरक्षणाचे नियम संरक्षण सचिवांनी ट्विटर वर सर्क्युलरचे छायाचित्र देखील शेअर केले आहे. यात म्हटलंय की सैनिकी शाळांमधील ६७ टक्के जागा त्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असतात, जेथे ती शाळा असते. उर्वरित ३३ टक्के जागांवर अन्य राज्य वा केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांचे प्रवेश होतात. यासाठी दोन याद्या तयार होतात - ए आणि बी. आता प्रत्येक यादीत १५ टक्के जागा अनुसूचित जातीसाठी, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमातीसाठी आणि २७ टक्के जागा ओबीसी (नॉन क्रिमी लेअर) प्रवर्गासाठी आरक्षित असतील. सध्या देशात एकूण ३३ सैनिकी शाळा सुरू आहेत. या शाळा संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली सैनिक स्कूल्स सोसायटीद्वारे चालवल्या जातात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jMbwMl
via IFTTT

Post a Comment

0 Comments