मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा संपल्या; दोन लाखांवर विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

Exams 2020: ऑक्टोबर- मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागाच्या सर्व परीक्षा या वेळेत आणि सुरळीत पार पडल्या. दिनांक २५ सप्टेंबर पासून सुरु करण्यात आलेल्या बॅकलॉग आणि नियमित सर्व परीक्षांचे यशस्वी नियोजन करून या परीक्षा व्यवस्थितरित्या पार पडल्या. चारही विद्याशाखा मिळून सुमारे ४०० हून अधिक परीक्षांचे महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागामार्फत यशस्वी नियोजन करण्यात आले होते. या सर्व परीक्षांना नियमित वर्गवारीतून १ लाख ५८ हजार तर बॅकलॉगसाठी ६७ हजार ५०० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, अशी माहिती प्रशासनाने दिली. या सर्व परीक्षांच्या नियोजनासाठी विद्यापीठामार्फत विविध विद्याशाखानिहाय समुह तयार करण्यात आले होते. त्याचबरोबर या सर्व परीक्षांच्या नियमित देखरेखीसाठी विद्यापीठाने तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील सातही जिल्ह्यात या परीक्षा ऑनलाईन माध्यमातून सुरळीत पार पडल्या असून ग्रामीण आणि दूर्गम भागात सुद्धा विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या ऑनलाईन परीक्षा दिल्या. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष नियोजन करण्यात आले होते तर महाविद्यालये आणि विद्यापीठ स्तरावर हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. या सर्व परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठ, सलंग्नित महाविद्यालयांच्या मार्फत बहुपर्यायी सराव प्रश्नपत्रिका, सराव परीक्षा आणि वेळापत्रकांचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. परीक्षांच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत लेखी परीक्षा सुरळीतरित्या पार पडल्या असल्याचे प्र. कुलगुरु प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. महाविद्यालयांकडून पोर्टलवर गुण अपलोड होतात येत्या काही दिवसातच या सर्व परीक्षांचे निकाल घोषित केले जाणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. 'निकाल लवकरच' मुंबई विद्यापीठातील सर्व शिक्षक हे विद्यापीठाचे बलस्थान असून त्यांनी अत्यंत कमी वेळेत अथक परीश्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षांचे यशस्वी नियोजन केले आहे. या सर्व परीक्षा सुरळीत पार पडल्याबद्दल सर्व प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि तज्ज्ञ समितीतील सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करीत आहे. या सर्व परीक्षांचे निकाल वेळेत जाहिर करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असून लवकरच या सर्व परीक्षांचे निकाल जाहिर केले जातील. - प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2T4w5c5
via IFTTT

Post a Comment

0 Comments