अनलॉक ५: शाळा-महाविद्यालये उघडण्याचा निर्णय राज्यांचा

केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी अनलॉक ५ च्या गाइडलाइन्स ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. परिणामी, ज्या प्रमाणे ऑक्टोबरमध्ये शाळा-महाविद्यालयांबाबत निर्णय घेण्यात आला होता, तोच नोव्हेंबर महिन्यातही कायम राहणार आहे. म्हणजेच, शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास केंद्र सरकारची परवानगी आहे, मात्र राज्यांनी आपापल्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. राज्यांतर्गत व्यक्ती आणि वस्तूंच्या वाहतुकीवर कोणतीही बंधने नसणार आहेत, असं गाइडलाइन्समध्ये म्हटले आहे. मात्र कंटेन्मेंट झोनमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत कडक लॉकडाऊन असेल. तसेच कोणतेही राज्य सरकार किंवा केंद्र शासित प्रदेश कंटेन्मेंट झोनच्या बाहेर, केंद्राच्या सल्लामसलतीशिवाय, परस्पर स्थानिक लॉकडाऊन करू शकणार नाही, असेही या मार्गदर्शक तत्त्वांध्ये म्हटले आहे. राज्यांमध्ये मेट्रो, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस, धार्मिक स्थळे, योगा आणि अन्य प्रशिक्षण संस्था, जीम, थिएटर आणि मनोरंजन पार्क उघडण्यास परवानगी आहे. शाळांच्या बाबतीतला निर्णय मात्र राज्य सरकाने घ्यावयाचा आहे. मंगळवारपर्यंत ३६,४६९ नव्या कोविड-१९ केसेस देशभरात नोंदल्या गेल्या आहेत. कोविड बाधित रुग्णांची देशातील संख्या ७९ लाख ४६ हजार ४२९ इतकी झाली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख १९ हजार ५०२ झाली आहे. महाराष्ट्रात कधी? महाराष्ट्रात दिवाळीपर्यंत तरी शाळा सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. शाळा सुरू झाल्या तरी प्राधान्याने दहावी, बारावीच्या वर्गांचा विचार होईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. मिझोराममधील शाळा उघडून पुन्हा बंद दरम्यान, केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास हिरवा कंदिल दाखवल्यानंतर मिझोराम राज्याने शाळा उघडल्या होत्या. मात्र अवघ्या आठ दिवसात अनेक विद्यार्थ्यांना कोविडची बाधा झाल्याने उघडलेल्या शाळा बंद करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34wYr4Z
via IFTTT

Post a Comment

0 Comments