उत्तराखंड सरकारची विद्यार्थ्यांना 'फ्री हायस्पीड वायफाय' भेट!

उत्तराखंड राज्य सरकारने विद्यार्थ्यांना मोठी भेट दिली आहे. राज्यातील सर्व सरकारी कॉलेज आणि विद्यापीठांसाठी मोफत हायस्पीड वायफाय इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. रविवारी ही सुविधा सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी ही घोषणा केली. सर्व सरकारी महाविद्यालये, विद्यापीठांना हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीशी जोडणारं उत्तराखंड हे देशातील पहिलं राज्य आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्र डोईवाला येथील शहीद दुर्गामल्ल शासकीय पदव्युत्तर महाविद्यालयापासून या उपक्रमाची सुरुवात केली. अशा प्रकारची सुविधा देणारं उत्तराखंड हे देशाचं पहिलं राज्य आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सोबतच तरुणांसाठी ही सुविधा वरदान ठरेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले, 'आमचा प्रयत्न आहे की तरुण केवळ रोजगार मिळवण्यासाठीच सक्षम बनू नयेत तर त्यांनी अन्य लोकांसाठी रोजगार देण्यायोग्यही बनावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल भारत अभियानातील हे महत्त्वाचे पाऊल आहे.' उत्तराखंड सरकारने महाविद्यालये आणि विद्यापीठांना 'इंटरनेट लीज लाइन' द्वारे हाय स्पीड वायफआय इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरवत आहे. उच्च शिक्षण राज्यमंत्री धनसिंह रावत म्हणाले की राज्यातील सर्व १०६ महाविद्यालये आणि पाच विद्यापीठांमधील दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kcj2jY
via IFTTT

Post a Comment

0 Comments