पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या फेरपरीक्षांना सुरळीत सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या फेरपरीक्षांना सुरळीत सुरुवात झाली असून, सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी गुरुवारी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा दिली आहे, अशी माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली आहे. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी परीक्षांमध्ये अडचणी आल्याचे नमूद केले. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारची तक्रार आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पुणे विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या फेरपरीक्षेला आज गुरुवारी ५ नोव्हेंबरपासून ऑनलाइन एमसीक्यू पद्धतीने सुरुवात झाली. तांत्रिक अडचणी, अतिवृष्टी, एका दिवशी दोन परीक्षा अशा विविध कारणांमुळे परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत परीक्षा घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परीक्षेबाबत विविध तक्रारी असणाऱ्या, विद्यार्थ्यांचीही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे २७ हजार विद्यार्थी अपेक्षित आहे. गुरुवारी झालेल्या परीक्षेत साधारण साडेअकरा हजार विद्यार्थ्यांची ६३४ विषयांसाठी परीक्षा होणार होती. मात्र, त्यापैकी केवळ पाच हजार विद्यार्थ्यांनी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत परीक्षा दिली. दोन ते तीन विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत तक्रार होती. त्यांची तक्रार तातडीने सोडवण्यात आली. फेरपरीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्या असल्याने, अनुपस्थित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नसल्याची शक्यता आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे रात्री आठ वाजेपर्यंत कोणत्याही तक्रारी आल्या नाहीत. विद्यार्थ्यांना तक्रारी असल्यास, त्यांनी थेट विद्यापीठाकडे नोंदवाव्या, अशी माहिती डॉ. काकडे यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36fsHBo
via IFTTT

Post a Comment

0 Comments