गणित, विज्ञान विषयांत अधिक गुण कसे मिळवावेत; राज्यपालांनी दिला मूलमंत्र

मुंबई: सातत्यपूर्ण अभ्यासाने असाध्य ते साध्य होते तसेच कठोर परिश्रमामुळे प्रावीण्य प्राप्त करता येते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दहावीत गणित, विज्ञान यांसह इतर विषयात चांगली प्रगती करायची असेल त्यांनी एकलव्याप्रमाणे एकनिष्ठतेने आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण अभ्यास करावा या शब्दात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना आज यशाचा मूलमंत्र दिला. पुणे येथील सुपरमाईंड फाउंडेशन या संस्थेने राज्यातील दहावीचे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचेसाठी ‘गणित, विज्ञान या विषयांत अधिक गुण कसे मिळवावेत‘ या विषयावर एका दूरस्थ परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादाचे राजभवन येथून उद्घाटन करताना राज्यपाल बोलते होते. करोनाच्या संसर्गामुळे सध्याचा काळ विद्यार्थी, शिक्षक व पालक सर्वांसाठीच कठीण झाला आहे. या विपरीत परिस्थितीत विज्ञान व गणित यांसारखे कठीण समजल्या जाणार्‍या विषयांचा अभ्यास कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी सूचना राज्यपालांनी शिक्षकांना केली. आजचे विद्यार्थी विद्यार्थी तंत्रज्ञान-स्नेही असल्यामुळे मोबाईल फोन, संगणक या माध्यमातून ज्ञान प्राप्त करीत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निसर्गदत्त बुद्धिमत्ता असते असे सांगून या बुद्धिमत्तेला पैलू पाडण्याचे कार्य शिक्षक व पालकांना करावे लागेल, असे राज्यपालांनी संगितले. करोनावर लस येण्यासाठी काही काळ जाणार आहे, अशावेळी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच राहिले पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक साधने नाहीत अशांपर्यंत देखील शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक पोहोचले पाहिजे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. परिसंवादात माजी आमदार मेधा कुलकर्णी, सुपरमाईंड फाउंडेशनच्या संचालिका मंजूषा वैद्य, दया कुलकर्णी, शालेय शिक्षण मंडळाच्या सदस्या डॉ. सुलभा विधाते, डॉ. जयश्री अत्रे, आदि सहभागी झाले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36mbZRK
via IFTTT

Post a Comment

0 Comments