मुंबईतल्या शाळांना १५ जानेवारीपर्यंत कुलूपच

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई ब्रिटनमधील करोनाच्या नव्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. याआधी ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आल्या होत्या. करोनाचा संसर्ग कमी होत असला तरी नव्या विषाणू प्रकाराने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यातच अनेक लोक नववर्ष स्वागतासाठी मुंबईबाहेर गेल्याने ते परतल्यावर ही संख्या वाढू शकते, असा अंदाजही बांधला जात आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात केली. मात्र कालांतराने करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर इयत्ता नववी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. यानुसार नोव्हेंबर अखेरीस हे वर्ग सुरू झाले. मात्र अंतिम निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा असल्याने मुंबईसह, ठाणे आणि परिसरातील इतर महापालिकांनी ३१ डिसेंबरपर्यंत शाळा व कॉलेजे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता १ जानेवारीपासून शहरातील शाळा सुरू होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र ब्रिटीश करोनाचा संभाव्य धोका लक्षात घेत १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यानंतर १८ जानेवारीपासून शहरातील वाणिज्य दूतावास शाळा सुरू करण्यास पालिका शिक्षण विभागाने मुभा दिली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34Su48U
via IFTTT

Post a Comment

0 Comments