दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील () रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एक जानेवारीपासून त्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे, प्रवेशअर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रवेशप्रक्रियेसाठी चार जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. राज्यातील सरकारी व खासगी आयटीआयमधील प्रवेशप्रक्रिया ऑगस्टपासून सुरू आहे. प्रवेशाच्या नियमित चार फेरी पूर्ण झाल्या. त्यानंतर समुपदेशन फेरी गुरुवारी संपली. याचदरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी म्हणून शुक्रवारपासून विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुरुवातीला ऑनलाइन अर्ज भरणे यासाठी विद्यार्थ्यांना चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे. एक ते चार जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. त्यानंतर पाच जानेवारीला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. याबाबतचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. ही फेरीही समुपदेशन फेरीप्रमाणे असून थेट संस्थास्तरावर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अशी असेल समुपदेशन फेरी २ जानेवारीला सर्व आयटीआयमधील रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे. १ ते ४ जानेवारीपर्यंत रिक्त जागांचा विचार करून विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनमधून संबंधित संस्थेसाठी ऑनलाइन नोंदणी करावी. ५ जानेवारीला गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. ६ व ७ जानेवारी असे दोन दिवस गुणानुक्रमे विद्यार्थ्यांना बोलावून प्रवेशाच्या जागांचे वाटप होणार आहे. याच दरम्यान विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणी, शुल्क भरून प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. खासगी संस्थास्तरावरील प्रवेश खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थास्तरावरील जागा व प्रवेश फेरीनंतर खासगी आयटीआयमध्ये रिक्त राहिलेल्या जागा संस्थास्तरावर भरता येणार आहेत. ही प्रक्रिया ८ ते १५ जानेवारीपर्यंत असणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी अधिक माहिती संचालनालयाच्या वेबसाइटवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pGaoNK
via IFTTT

Post a Comment

0 Comments