Also visit www.atgnews.com
'या' जिल्ह्यात शाळा उघडण्याचा मार्ग मोकळा
म. टा. वृत्तसेवा, वसई जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर वसई-विरार महापालिका आयुक्तांनी देखील महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्वच शाळा सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाल्यापासून सर्वच शाळा बंद होत्या. फक्त ऑनलाइन माध्यामातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू होते. त्यानंतर २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला. मात्र करोनास्थिती पाहता महापालिका हद्दीत आणि जिल्हा स्तरावर शाळांबाबत निर्णय घेण्याची मुभा सरकारने दिली होती. त्यामुळे जिल्हास्तरावर निर्णय घेत पालघर जिल्हाधिकाऱ्यांतर्फे जिल्ह्यातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचा निर्णय त्यावेळी घेतला. करोना रुग्णसंख्या कमी असलेल्या ग्रामीण भागात आणि ऑनलाइन सुविधा नसलेल्या आदिवासीबहुल भागात शाळा सुरू करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील ७८७ शाळांपैकी १९७ शाळा प्रत्यक्ष सुरू आहेत. मात्र आता करोना रुग्णसंख्या कमी झाल्याने पालघर जिल्हाधिकारी यांनी नुकताच नवीन निर्णय घेतला आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायती आणि ग्रामीण क्षेत्रातील शाळा तेथील व्यवस्थापन समितीने ठराव मंजूर करून विद्यार्थी व पालक यांनी संमती दिल्यास जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये वसई-विरार महापालिका क्षेत्र वगळण्यात आले होते. महापालिका स्तरावर करोनास्थिती पाहता आयुक्तांनी निर्णय घेणे अपेक्षित असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र वगळून निर्णय घेतला होता. मात्र महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनीदेखील महापालिका हद्दीतील नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. याबाबत त्यांनी नुकतेच लेखी पत्रक काढले. यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची करोना चाचणी बंधनकारक केली आहे. तसेच सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्वतयारी करण्याचेदेखील नमूद केले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त गंगाथरन डी. यांनी सांगितले. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील करोना रुग्णसंख्या १००पेक्षा कमी आहे. त्यातच पालघरच्या ग्रामीण भागात ई-लर्निंगची सुविधादेखील अनेक विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसल्याने त्यांच्या पालकांकडून शाळा सुरू करण्याची मागणी होत होती. तसेच अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाइन सुविधा नसल्याने मोलमजुरी करण्याकडे वळत होते. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणण्यासाठी ग्रामीण भागातील सर्वच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. - डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच शाळा व्यवस्थापनातर्फे शाळा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. पालक आणि शिक्षक यांच्या सभा घेणे, संमतीपत्र मागविणे, याबाबत तयारी सुरू झाली आहे. सरकारच्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांनुसार शाळेमध्ये खबरदारी घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेमध्ये पाल्याला पाठविण्यास संमती दर्शविली, त्या सर्व विद्यार्थ्यांचे वर्ग शाळेला घ्यावे लागणार आहेत. ज्यांनी नकार दर्शवला अशांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठीदेखील शाळेने तयारी केली आहे. - माणिक दोतोंडे, अध्यक्ष, वसई तालुका मुख्याध्यापक संघटना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही शाळा करोना रुग्ण कमी झाल्याने याआधीच सुरू झाल्या आहेत. मात्र उर्वरित शाळा सुरू करण्याची परवानगी असली, तरी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र आल्याशिवाय शाळा सुरू करता येणार नाही. त्याबाबत शाळांना प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे शाळा सुरू करण्याची परवानगी आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शाळा एकत्र सुरू न होता टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे. - संगीता भागवत, माध्यमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद पालघर
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rK3qcn
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments