एप्रिलपासून शाळा सुरू व्हायला हव्यात: ६९ टक्के पालकांचे मत

2020: एप्रिलपासून शाळा सुरू व्हायला हव्यात असे ६९ टक्के पालकांना वाटत आहे. एप्रिलपासून जेव्हा नवे शैक्षणिक सत्र सुरू होईल, तेव्हा मुलांनी प्रत्यक्ष शाळेत जायला हवे, असे या पालकांना वाटत आहे. एका सर्वेक्षणातून हे निरीक्षण पुढे आले आहे. सुमारे १९ हजार पालकांची मते या सर्वेक्षणातून आजमावण्यात आली. २६ टक्के पालक असेही होते, ज्यांना कोविड-१९ लस दिल्यानंतरच मुलांना प्रत्यक्ष शाळेत बोलवावे असे वाटत आहे. 'सध्याची देशातील कोविड-१९ महामारी स्थिती पाहता शाळा एप्रिल २०२१ पासून किंवा त्यानंतर जेव्हा नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल, तेव्हा सुरू व्हाव्यात,' असे मत ६९ टक्के पालकांनी व्यक्त केले. अनेक पालकांना अद्यापही आपल्या मुलांना करोना काळात शाळेत पाठवण्याची भिती वाटत आहे. लोकलसर्कल्सने हा ऑनलाइन सर्व्हे घेतला. कोविड-१९ लस मुलांना टोचण्याबाबतही पालकांची मते जाणून घेण्यात आली. केवळ २६ टक्के पालकांनी आपल्या मुलांना लस टोचून घेण्याबाबत मान्यता दर्शवली. ५६ टक्के पालक तीन किंवा अधिक महिने थांबून, लशीचे परिणाम जाणून घेतल्यानंतर मुलांना लस देण्याच्या बाजूचे आहेत. कोविड-१९ महामारीमुळे गेल्यावर्षी देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आल्यानंतर शाळा बंदच असून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. १५ ऑक्टोबरपासून काही भागात शाळा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात २३ नोव्हेंबरपासून शाळा उघडण्यास स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेनुसार परवानगी देण्यात आली आहे. बिहार, आसाम, केरळ, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांनी या महिन्यापासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष शाळांमध्ये भरवण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीने लस आल्याशिवाय शाळा न उघडण्याचा निर्णय घेतला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38YpmYv
via IFTTT

Post a Comment

0 Comments