Also visit www.atgnews.com
नाशिकमध्ये शाळा सुरू; पण ६२ शिक्षकांना करोनाची लागण
नाशिक: सुमारे नऊ महिन्यांच्या खंडानंतर नाशिकमधील शाळा सोमवारी सुरू झाल्या, मात्र शाळेत दाखल होण्यापूर्वीच ६२ शिक्षकांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. नाशिकमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू झाले. नाशिक ग्रामीण आणि शहरच्या मिळून १,३२४ शाळांपैकी ८४६ शाळांनी नववी ते बारावीचे वर्ग उघडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. एकूण १,२१,५७९ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करून घेण्यात आल्या होत्या. ७,०६३ शिक्षक-मुख्याध्यापक आणि २,५०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड-१९ चाचणी झाली होती. यापैकी ६२ शिक्षक / मुख्याध्यापक आणि १० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार, ५० टक्के विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील. उर्वरित दुसऱ्या दिवशी येतील. म्हणजेच विद्यार्थ्यांनी दर दिवसाआड शाळेत यायचे आहे. दरम्यान, कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, शाळेचे निर्जंतुकीकरण, थर्मल स्कॅनिंग, मास्क, सॅनिटाझर्सचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतरांसाठी बंधनकारक आहे. दरम्यान, नऊ महिन्यांपासून भकास असलेल्या शहरातील शाळांचे प्रांगण सोमवारी विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजले. शाळेत प्रवेश केल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. युनिफॉर्म, स्कूलबॅगसह मास्क आणि सुरक्षित वावरच्या नियमाचे पालन करीत विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला. शाळा सुरू करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला बहुतांश पालकांची सहमती नसली तरी ३५ टक्के विद्यार्थीसंख्येने अखेर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. चार जानेवारीपासून शहरासह जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा एक दिवसाआड ५० टक्के उपस्थितीसह टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, ज्या पालकांची आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास संमती आहे, अशा विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतिपत्रानंतरच शाळेत प्रवेश देण्यात येणार होता. बहुतांश पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्यामुळे शाळा सुरू होऊनही शाळांमध्ये कमी उपस्थिती पहायला मिळाली. काही शाळा सकाळी ८.३० ते दुपारी १२ अशा सकाळच्या सत्रात, तर काही शाळा दुपारी १२ ते ३.३० अशा दुपारच्या सत्रात भरलेल्या पहायला मिळाल्या. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी असला, तरी शाळा प्रशासनाने मात्र जय्यत तयारी केली होती. सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर, मास्क यासह सुरक्षित वावरच्या नियमाचे काटेकोर पालन शाळा प्रशासनामार्फत करण्यात आले. मराठी माध्यमाच्या जवळपास सर्वच शाळांमध्ये अल्प प्रमाणात का असेना विद्यार्थ्यांची उपस्थिती पहायला मिळाली. परंतु इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांमध्ये पालकांनी संमतिपत्र न दिल्यामुळे या शाळा बंदच ठेवण्यात आल्या होत्या. नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी जिल्ह्याभरातील शाळांना भेटी देऊन या व्यवस्थेची पाहणी केली. शहरातील खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांसोबतच महापालिकेच्या १३ माध्यमिक शाळाही सोमवारपासून सुरू झाल्या. या शाळांमध्येही कमी प्रमाणातच उपस्थिती असल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी शासकीय कन्या प्रशालेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या शाळांसोबत ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गातही विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद होता. केवळ १५ ते २० टक्के विद्यार्थी पहिल्या दिवशी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. या सगळ्या वातावरणातही उपस्थित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मात्र मोठ्या कालावधीनंतर शाळेत आल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ba1Kmo
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments