पोलीस भरती: पहिल्या टप्प्यात ५,३०० पदे भरणार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद पोलिस दलात आगामी काही दिवसात पोलिस भरती सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच हजार ३०० जणांची भरती केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात सात हजार ५०० जणांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. शक्ती कायद्यासंदर्भात विधान परिषदेच्या विशेष समितीच्या बैठकीनिमित्त राज्याचे गृहमंत्री शहरात आले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, पोलिस दलात १२ हजार ५०० कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मराठा आरक्षणामुळे या भरती प्रक्रियेला विलंब झाला. मात्र विविध संघटनांशी चर्चा केल्यानंतर अखेर भरतीचा मार्ग खुला झालेला आहे. यामुळे आगामी काही दिवसात पहिल्या टप्पयात पाच हजार ३०० जणांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पोलिस भरती पाठोपाठ डॉक्टर भरतीही होणार आहे. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राज्यात एक लाख घरे बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले. आगामी काही दिवसात राज्यात ११२ हे आपतकालीन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. या क्रमांकावर सर्वसामान्य नागरिकांना लवकर मदत मिळावी. यासाठी पोलिस विभाग दोन हजार चारचाकी वाहन आणि अडीच हजार दुचाकी वाहन 'जीपीआरएस' तंत्रज्ञानासह विकत घेणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना लवकरच मदत मिळावी. यासाठीही याचा उपयोग होणार आहे. ही योजना आगामी काही महिन्यात लागू केली जाणार असल्याचेही संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. यावेळी पत्रकार परिषदेत आमदार विक्रम चव्हाण, अमोल मिटकरी तसेच पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांची उपस्थिती होती. मनोधैर्य योजनेबाबत लवकरच निर्णय राज्यात पीडित महिलेच्या मदतीसाठी मनोधैर्य ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत विविध प्रकारच्या घटनांसाठी विविध मदत देण्यात येत असते. या योजनेच्या लाभासाठी न्यायिक प्रक्रियेतून जावे लागते. मात्र, या योजनेतंर्गत पीडित महिलेला लवकर मदत मिळावी. यासाठी प्रक्रियेत बदल केले जाणार आहे. या योजनेंतर्गत पीडितेला मदत जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त यांच्याकडून मिळावी. यासाठी बाल विकास विभागाकडून परिपत्रक काढण्यात येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iZdc6v
via IFTTT

Post a Comment

0 Comments