लोकल सेवेखेरीज कॉलेजे उघडणे अशक्यच

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर बंद झालेली शहराची लाइफलाइन असलेली लोकल सेवा अद्याप सर्वांसाठी खुली झालेली नाही. यामुळे शहरातील अनेक व्यवहार आजही पूर्णपणे सुरळीत झालेले नाही. याचा फटका कॉलेजांनाही बसणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील विद्यापीठांना प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याबाबत सूचना केल्या होत्या. यासाठी काय काळजी घ्यायची इथपासून ते वर्ग किती वेळ चालवायचे याबाबतच्या सर्व सूचना आयोगाने दिल्या आहेत. यानुसार देशातील आयआयटीसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच इतर विद्यापीठांनीही कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठानेही कॉलेज सुरू करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी काही विद्यार्थी संघटनांकडून होत आहे. मात्र, जोपर्यंत लोकल सुरू होणार नाहीत, तोपर्यंत ऑफलाइन वर्ग म्हणजेच प्रत्यक्ष कॉलेजांत वर्ग भरवणे शक्य नसल्याचे विद्यापीठाचे मत आहे. त्यामुळे सर्वांना लोकल प्रवासाची मुभा मिळाल्यानंतरच कॉलेज सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. कॉलेजांनी लॉकडाउन काळात ऑनलाइन शिक्षण सुरू केले. यामुळे कॉलेजे बंद असली तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र सुरू आहे. पण असे असले तरी आजही शहरातील अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात सहभागी होताना नेटवर्कसाठी झगडावे लागत आहेत. तर अनेक विद्यार्थ्यांनी केवळ या कारणामुळे उच्च शिक्षणापासून दूर राहणे पसंत केले आहे. यामुळे काही विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाउनच्या सुरुवातीला केलेल्या एका पाहणीमध्ये मुंबई विद्यापीठातील ७८ टक्के विद्यार्थ्यांकडेच डिजिटल अॅक्सेस असल्याची बाब समोर आली होती. म्हणजेच थोडेथोडके नव्हे तर, तब्बल २२ टक्के विद्यार्थी या सुविधेपासून वंचित आहेत. यामुळे या सर्वांचा विचार करून सरकारने लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा 'प्रवास' सुरू करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी काही विद्यार्थी सोशल मीडियावरून करत आहेत. प्रात्यक्षिके रखडली विज्ञान, इंजिनीअरिंग, फार्मसी आदी क्षेत्रांत पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळणे ही बाबही महत्त्वाची आहे. यामुळे ऑनलाइन शिक्षणाद्वारे केवळ थीअरी शिक्षण पूर्ण होत आहे. प्रात्यक्षिक शिक्षण देण्यासाठी आम्ही कॉलेज कधी सुरू होणार याची वाट पाहात असल्याचे एका इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्राचार्यांनी सांगितले. याचबरोबर बीएससीच्या विद्यार्थ्यांनाही प्रात्यक्षिक शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र तसेच जीवशास्त्र याचे प्रात्यक्षिक शिक्षण अद्याप अपूर्ण आहे. ते झाले नाही तर विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. सध्या ऑनलाइन शिक्षण देत आहोत. मात्र ते पुरेसे नसून, केवळ प्रात्यक्षिक शिक्षणासाठी तरी टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये बोलावण्याची मुभा द्यावी, असा विचार विज्ञान शिक्षकाने मांडला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35lFXVh
via IFTTT

Post a Comment

0 Comments