Also visit www.atgnews.com
आरोग्य विभागाच्या परीक्षेत सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान शहरातील सीएमसीएस कॉलेजच्या केंद्रावर जागा अपुरी पडल्याने दोन विद्यार्थ्यांना एका बेंचवर बसून परीक्षा द्यावी लागल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी घडला. केंद्रावरील अनागोंदीमुळे सुरक्षित वावराच्या नियमाचा फज्जा उडून परीक्षार्थींच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनीही संताप व्यक्त केला. राज्य सरकारच्या आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी राज्यभरातील विविध केंद्रांवर रविवारी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील गंगापूररोडवरील सीएमसीएस कॉलेजमध्ये सकाळच्या सत्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञपदाच्या परीक्षेदरम्यान एक हजार ९०० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी हजेरी लावली. परंतु, येथे केवळ एक हजार विद्यार्थ्यांचीच आसनव्यवस्था असल्याने एका बेंचवर दोन विद्यार्थी बसविण्याचा प्रकार परीक्षा केंद्रावर सुरू झाला. विद्यार्थी, पालकांनी याला विरोध केल्यामुळे परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ झाला. अखेर गंगापूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. परंतु, आसनव्यवस्थेसाठी जागाच नसल्याचे कारण देत एका बेंचवर दोन विद्यार्थ्यांना बसून पेपर द्यावा लागला. या गोंधळामुळे सकाळी दहा ते बारा या नियोजित होणारा हा पेपर साडेअकरा ते दीड वाजेदरम्यान झाला. एकीकडे करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना एका बेंचवर दोन विद्यार्थी बसविण्याच्या प्रकाराला पोलिसांनीही कोणताच विरोध न केल्याचे निदर्शनास आले. एका बेंचवर दोन विद्यार्थी बसविल्यामुळे कॉपी होण्याची भीतीही पालकांमधून व्यक्त होत होती. परंतु, वेगवेगळे पेपरचे सेट देण्यात आल्याचे परीक्षा केंद्रामार्फत सांगण्यात आले. करोना प्रादुर्भवाचा धोका पुन्हा वाढत असतानाच परीक्षेदरम्यान झालेला हा प्रकार परीक्षार्थींच्या जिवाशी खेळ करणारा ठरू शकतो, अशी भीती पालकांनी व्यक्त केली. -- नांदेडच्या विद्यार्थिनीस नाशिकचे केंद्र! या परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र देतानाही मोठा ढिसाळपणा झाल्याचे निदर्शनास आले. नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थिनीला परीक्षेसाठी नाशिकचे केंद्र देण्यात आले होते. दुपारच्या सत्रात पेपर असल्यामुळे, तसेच कोणी नातेवाईकही नसल्याने सकाळपासून कॉलेजच्या आवारातच या विद्यार्थिनीसह तिच्या पालकांना थांबावे लागले. चाळीसगावच्या विद्यार्थ्याने परीक्षा अर्जात धुळे केंद्राची मागणी केली होती. परंतु, त्यालाही नाशिकचे केंद्र देण्यात आले होते. त्यामुळे या परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. .......... पोलिसांसमोर नियमांचे उल्लंघन परीक्षा केंद्रावरील गोंधळामुळे कॉलेज प्रशासनामार्फत पोलिसांना पाचारण करण्यात आले होत. यावेळी 'कोव्हिड-१९'च्या सर्व मार्गदर्शक नियमावलीचे उल्लंघन होत असतानादेखील पोलिसांनी मात्र केवळ परीक्षा सुरळीत कशी पार पडेल याकडेच लक्ष दिले. पोलिसांसमोरच सुरक्षित वावराच्या नियमांचे उल्लंघन करून एका बेंचवर दोन विद्यार्थ्यांना बसविण्यात येत होते. मात्र, तरीदेखील पोलिसांनी याबाबत कॉलेज प्रशासनाला कोणताही जाब न विचारल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. ............... दुसऱ्या पेपरला बदलली व्यवस्था आरोग्य विभागाच्या दुपारच्या सत्रात झालेल्या सीनिअर क्लर्क पदाच्या परीक्षेला मात्र विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था बदलण्यात आली होती. या पेपरला एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याला बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था झाल्यानंतर उरलेल्या ६० विद्यार्थ्यांसाठीदेखील वेगळी व्यवस्था करण्यात आली होती.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r0deOy
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments