बारावीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी घटली

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्याभरात दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन होणार असल्याने राज्य मंडळाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे. मुंबई विभागीय मंडळात आतापर्यंत दहावीसाठी तीन लाख ५९ हजार, तर बारावीसाठी दोन लाख ९२ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. करोनामुळे मुंबईतील विद्यार्थी एकही दिवस शाळेत गेले नाहीत. त्यामुळे यंदा अनेक विद्यार्थी परीक्षेला न बसण्याचा निर्णय घेण्याची शक्यता विविध सर्वेक्षणांतून समोर आली होती. बारावीला गतवर्षी तीन लाख १४ हजार ४४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन लाख १३ हजार २९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा मात्र आतापर्यंत केवळ दोन लाख ९२ हजार ७६८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे, तर २० हजार १६५ फेरपरीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीसाठी गतवर्षी तीन लाख ३२ हजार ७४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन लाख ३१ हजार १३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यावर्षी तीन लाख ५९ हजार ८०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर १६ हजार ३०८ फेरपरीक्षार्थी आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rX0B7h
via IFTTT

Post a Comment

0 Comments