पालिकेच्या नव्या सीबीएसई शाळांच्या प्रवेशासाठी रांगा; सोडत लवकरच

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका शिक्षण विभागाने यंदापासून सुरू केलेल्या सीबीएसई शाळांच्या प्रवेशाला मुंबईतील पालकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. महापालिकेच्या नवीन १० शाळांमध्ये असलेल्या तीन हजार ७६० जागांसाठी तब्बल नऊ हजार ५२३ विद्यार्थ्यांचे प्रवेशअर्ज आले आहेत. मुंबई महापालिकेच्या सीबीएसईच्या १० शाळांमध्ये यंदा छोटा-शिशु, मोठा-शिशु, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि सातवी या वर्गात प्रवेश करण्यासाठी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या शाळांमध्ये अर्ज करण्याची मुदत बुधवारी संपली असून लवकरच प्रवेशाची सोडत जाहीर केली जाणार असल्याची माहिती पालिका शिक्षण विभागाने दिली. मुंबई महापालिका शिक्षण विभागाने मागील वर्षी याच धर्तीवर दोन शाळा सुरू केल्या होत्या. यंदा १० शाळा वाढवल्या आहेत. या शाळा मुंबई पब्लिक स्कूल नावाने सुरू करण्यात आल्या आहेत. गरीब विद्यार्थ्याना सीबीएसईच्या धर्तीवर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी हा वेगळा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. या शाळांमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवातीला १८ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण पालकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि त्यांच्याकडून करण्यात आलेल्या मागणीमुळे ही मुदत २४ मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. काही शाळांमध्ये उपलब्ध जागांपेक्षा प्रवेशअर्ज कमी आले आहेत. अशा शाळांमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रवेश देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. या आहेत नवीन शाळा मुंबई पब्लिक स्कूल - भवानी शंकर मार्ग (दादर), मुंबई पब्लिक स्कूल काणे नगर (अँटॉप हिल), मुंबई पब्लिक स्कूल - चिकूवाडी (बोरिवली पश्चिम), मुंबई पब्लिक स्कूल - जनकल्याण नगर (मालाड पश्चिम), मुंबई पब्लिक स्कूल - प्रतीक्षानगर (जोगेश्वरी पश्चिम ), मुंबई पब्लिक स्कूल - राजावाडी (विद्याविहार), मुंबई पब्लिक स्कूल - अझीझ बाग (चेंबूर), मुंबई पब्लिक स्कूल - तुंगा व्हिलेज (पवई), मुंबई पब्लिक स्कूल - मिठागर (मुलुंड पश्चिम), मुंबई पब्लिक स्कूल हरियाली (विक्रोळी), मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगर (जोगेश्वरी पूर्व) आणि मुंबई पब्लिक स्कूल - वूलन मिल (माहीम) वर्गनिहाय प्रवेशक्षमता व आलेले अर्ज वर्ग -- प्रवेशअर्ज -- उपलब्ध जागा नर्सरी -- ७१५ -- ४८० ज्यु. केजी -- २५२३ -- ४८० सि. केजी -- १४२१ -- ४०० पहिली -- १७१६ -- ४०० दु सरी -- ८४४ -- ४०० तिसरी -- ७१० -- ४०० चौथी -- ६२३ -- ४०० पाचवी -- ५७६ -- ४०० सहावी -- ३९५ -- ४०० एकूण -- ९५२३ --३७६०


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3u3MsWG
via IFTTT

Post a Comment

0 Comments