फी एकरकमी भरा; शाळांची पुन्हा मनमानी

म. टा. वृत्तसेवा, ठाणे करोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन वर्ग घेतले जात आहेत. पण शाळांच्या फीवरून गेल्या वर्षभरापासून वाद सुरू आहेत. पुढील वर्षाची फी एकरकमी भरण्याचा तगादा पालकांकडे लावला जात आहे. ठाण्यातील काही शाळांचा मनमानी कारभार पुन्हा सुरू झाला असून एका शाळेने पुढील शैक्षणिक वर्षाची संपूर्ण फी ३१ मेपर्यंत भरण्यास पालकांना सांगितले आहे. याव्यतिरिक्त, दोन टर्मची फी वेगळी असून फीमध्ये १५ टक्केही वाढही करण्यात आली आहे. यामुळे पालकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे. करोनाची साथ येण्यापूर्वी तीन महिन्यांची फी आगाऊ भरली जात होती. गेल्या वर्षी करोनाचा संसर्ग असताना, म्हणजेच शाळा बंद असताना आणि शाळेचे खर्च बरेचसे कमी असतानाही फी कमी झाली नाही. याउलट, फीमध्ये वाढ न करून आम्ही पालकांवर उपकारच करत आहोत, असेही शाळेतर्फे दाखवण्यात आल्याचा आरोप पालक संघटना करत आहेत. कम्प्युटर फीच्या नावाखाली यापूर्वी वर्षाला ६०० रुपये घेतले जात होते. गेले संपूर्ण वर्षभर शाळा बंद असूनही कम्प्युटर फी घेतली गेलीच. तसेच फी भरण्यासाठी ठराविक ऑनलाइन अॅपचाच वापर करण्याचा अट्टहास शाळेकडून केला जात असल्याचे पालकांनी सांगितले. येत्या शैक्षणिक वर्षातही शाळा कधी भरेल हे अद्याप स्पष्ट नाही. अशा परिस्थितीत, संपूर्ण वर्षाची फी आगाऊ भरण्याची अट का टाकली जात आहे, असा सवाल पालकवर्गातून केला जात आहे. शिवाय १५ टक्के फी वाढविण्यातही आलेली आहे. करोनाच्या संकटामुळे अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, उत्पन्नावर परिणाम झाला आहे. शिवाय ऑनलाइन वर्ग भरत असल्यामुळे पालकांना कम्प्युटर, इंटरनेट इ. साठी वेगळा खर्च करावा लागला. अशा परिस्थितीत फी वाढ आणि संपूर्ण वर्षाची फी आगाऊ भरण्याची अट ठेवणे हे अन्यायकारक आहे. शाळेने फी वाढीसंबंधी जे पत्रक पाठवले आहे, त्यामध्ये 'वाढीव फी भरा, मान्य नसेल तर दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्या,' असे सांगण्यात आले आहे. याबाबत शाळेच्या प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31Be7SH
via IFTTT

Post a Comment

0 Comments