Also visit www.atgnews.com
'आरटीई'ची लॉटरी ६ एप्रिलला जाहीर होण्याची शक्यता
म. टा. प्रतिनिधी, पुणे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांत राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेशप्रक्रियेची लॉटरी येत्या सहा एप्रिलला जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रवेशाची लॉटरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यासाठीचे नियोजन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. या प्रवेशप्रक्रियेत मंगळवारपर्यंत दोन लाख २१ हजार ५४८ पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज भरले आहेत. आरटीई प्रवेशप्रक्रियेत यंदा नऊ हजार ४३२ शाळांनी नोंदणी केली असून, प्रवेशासाठी एकूण ९६ हजार ६८४ जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तीन ते ३० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत दोन लाख २१ हजार ५४८ पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज नोंदविल्याचे स्पष्ट झाले आहे. नोंदणीची मुदत संपल्यावर आता सहा एप्रिलला प्रवेशाची लॉटरी काढण्याचे निश्चित होत आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांनी तीन एप्रिलपर्यंत 'डुप्लिकेट फॉर्म रिमूव्ह' करण्याचे काम पूर्ण करावे. तीन एप्रिलनंतर फॉर्म रिमूव्ह करता येणार नाही, याची गांभीर्याने नोंद घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लॉटरी जाहीर होणार असल्याचे चित्र आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढीची शक्यता कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती व सूचना आरटीईच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. सर्वाधिक चुरस पुण्यात पुणे जिल्ह्यात ९८५ शाळांची आरटीई प्रवेशप्रक्रियेत नोंदणी झाली असून, यात १४ हजार ७७३ एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या जागांसाठी सर्वाधिक ५५ हजार ३९१ अर्ज नोंदणी झाली आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वांत कमी २२१ अर्ज पालकांनी भरले आहेत. पुणे जिल्ह्यात प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत तिप्पट अर्ज आले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेशप्रक्रियेत सर्वाधिक चुरस पुणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Ocxezs
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments