शालेय पोषण आहार वाटप तूर्तास नको; भाजपा शिक्षक आघाडीची मागणी

मुंबई: राज्यात करोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १ मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन असताना देखील शासनाच्या आदेशामुळे शाळांना शालेय पोषण आहार वाटप करावे लागत असून हे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणारे असून सध्यातरी ह्या वाटपाला स्थगित करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीने शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे. याबाबत भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्तांना पत्र लिहून धान्य वाटप पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. मुंबई, ठाणे रायगड पालघर राज्यातील सर्वच जिल्ह्यात रुग्णांची संख्या चिंताजनक वाढत आहे. करोनाची साखळी तुटण्यासाठी राज्य शासनाने कठोर निर्बंध जाहीर केले आहे. त्यातच शालेय पोषण आहार अंतर्गत पालकांना धान्य वाटप करण्यासाठी शाळांपर्यंत धान्य पोहचले आहे. अनेक शाळांनी धान्य वाटपाचे शेड्युल बनविले आहे. यामुळे शाळांमध्ये पालकांची गर्दी उसळून करोना बाधित होण्याची भीती अनेक शाळांचे मुख्याध्यापक व्यक्त करीत असून सदर धान्य वाटपाचा कार्यक्रम काही कालावधीसाठी पुढे ढकलण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सह संयोजक अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे. धान्यवाटप करायला शिक्षकांचा विरोध नसून सध्या करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काही कालावधीसाठी पुढे ढकलण्याची मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे. मुंबई ठाण्यातील अनेक मोठ्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असल्याने धान्यावाटपाचे नियोजन कसे करावे ही चिंता शिक्षकांना व मुख्याध्यापकांना पडली आहे. यातच करोनाचा संसर्ग झाला तर याला जबाबदार कोण? असा सवालही विचारला जात आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eyUG32
via IFTTT

Post a Comment

0 Comments