Also visit www.atgnews.com
दहावीची परीक्षा रद्द झाल्याने कलचाचणीवर प्रश्नचिन्ह
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी कलमापन व अभिक्षमता चाचणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. परीक्षेपूर्वी होणारी परीक्षेनंतर घेण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले, परंतु परीक्षाच रद्द झाल्याने काय करायचे, अशा गोंधळात प्रशासन अडकले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थांना करिअरच्या दृष्टिकोनातून कलचाचणी घेण्यात येते. विद़यार्थ्यांना यातून आपला कल कोणत्या क्षेत्राकडे आहे हे जाणून घेता येते. सात क्षेत्रातील कल या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना कळतो. करिअरची वाट निवडण्यासाठी चाचणी महत्त्वपूर्ण ठरते, परंतु यंदा चाचणी होणार की, नाही यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. करोनामुळे दहावी, बारावीच्या फेब्रुवारी-मार्चमधील परीक्षा एप्रिल-मेमध्ये घेण्याचे जाहीर करण्यात आले, परंतु करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने दहावीच्या परीक्षा रद्द करीत बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. करोनामुळे कलचाचणीही यंदा लांबली. दरवर्षी परीक्षेपूर्वी जानेवारी-फेब्रुवारीमध्येच परीक्षा होते. परीक्षेच्या निकालासोबत विद्यार्थ्यांना कलचाचणीचा अहवाल दिला जातो. परंतु यंदा शाळा बंद असल्याने कलचाचणीचे नियोजन करणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये शक्य झाले नाही. शिक्षण मंडळ, विद्या प्राधिकरणाने परीक्षेनंतर कलचाचणी होणार असे स्पष्ट केले, परंतु आता दहावीची परीक्षाच रद्द झाल्याने कलचाचणीचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत शिक्षण मंडळ, विद्या प्राधिकरणाच्या अधिकारी सूत्रांनी सांगितले की, याबाबतचा अंतिम निर्णय शासनस्तरावरूनच घेतला जाईल. परंतु त्याची नियोजित प्रमाणे तयारी केली जाईल असेही संबंधितांनी सांगितले. कलचाचणी झाली तर, विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागणार की, ऑनलाइन घरून घेतली जाणार, त्याबाबतच्या येणाऱ्या तांत्रिक अडचणी कशा दूर केल्या जाणार याबाबतही शिक्षण विभागाला नियोजन करावे लागणार आहे. कलचाचणी ठरते महत्त्वपूर्ण कलचाचणी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरते आहे. त्यात कला, ललित कला, वाणिज्य, कृषी, गणवेश धारी सेवा, तांत्रिक व आरोग्य विज्ञान अशा सात क्षेत्रातील आपल्याला कोणते क्षेत्र उपयुक्त ठरू शकते, कोणत्या क्षेत्राकडे आपला कल आहे हे विद्यार्थ्याला समजते. मागील वर्षातील निकालातून विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांकाचा कल संरक्षण दलात जाण्याचा समोर आला. त्यापाठोपाठ वाणिज्य शाखा, तांत्रिक अभ्यासक्रमाकडेही कल कायम असल्याचे लक्षात आले होते. मागील वर्षी औरंगाबाद विभागातील एक लाख ८४ हजार २५७ विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. यंदा दहावीला परीक्षेला विभागातील पाच जिल्ह्यांतून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख ७६ हजार १९३ आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3e7TEfs
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments