Pariksha Pe Charcha Live: परीक्षा हेच आयुष्य नव्हे - पंतप्रधान

Pariksha Pe Charcha: परीक्षा अचानक येत नाही आणि जे अचानक येत नाही त्याची भीती कशाला बाळगायची? आणि भीती तुम्हाला परीक्षेची नसतेच, भीती असते ती या भावनेची की परीक्षाच सर्व काही आहे आणि याला कारणीभूत आपल्या आजूबाजूची मंडळी असतात. म्हणूनच पालकांनी हे ध्यानात घ्या की परीक्षा हेच आयुष्य नव्हे, तो आयुष्यातला एक लहान टप्पा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण देऊ नका, अशा शब्दात यांनी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाची सुरुवात करत विद्यार्थ्यांना धीर दिला. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची लाइव्ह संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना परीक्षेतील ताण व्यवस्थापनाचे धडे दिले. हा कार्यक्रम यंदा प्रथमच करोनामुळे व्हर्च्युअल पद्धतीने झाला. ते म्हणाले, 'पूर्वी पालक विद्यार्थ्यांसोबत सहज संवाद साधायचे, दैनंदिन विविध विषयांवर संवाद साधायचे. आता पालकांना मुलांची प्रगती पाहण्यासाठी त्याची गुणपत्रिका हवी असते.' परीक्षा ही जीवन घडवण्याची एक संधी परीक्षा म्हणजे आयुष्याचा अंत नव्हे, ती आयुष्य घडवण्याची एक संधी असते. तिला एक कसोटी म्हणू पाहायला हवे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले. ऊर्जेचे प्रत्येक विषयासाठी समसमान वाटप करा जे आवडते ते आपण आधी करतो, विद्यार्थी सहज, सोप्या आणि त्यांना आवडणाऱ्या विषयाचा जास्त अभ्यास करतात आणि कठिण विषयाला घाबरतात. उलट कठीण असतं त्याला आधी सामोरे जा. परीक्षेत असं म्हटलं जातं की सोपं आधी सोडवा, पण मी तर म्हणेन जे कठीण आहे त्याचा निपटारा सर्वात आधी करायला हवा. रिकामा वेळ हवाच एका विद्यार्थ्याने पंतप्रधानांना रिकाम्या वेळी काय करायचं असा प्रश्न विचारला. मोदी म्हणाले, 'रिकामा वेळ मिळणं ही पर्वणीच. रिकाम्या वेळेचा तुम्ही कसा सदुपयोग करता हे महत्त्वाचं. अभ्यास करून कंटाळा आला की थोडा विरंगुळा हवाच. पण असं व्हायला नको की रिकाम्या वेळी तुम्ही असा काही वेळकाढूपणा कराल की सगळा वेळ कसा गेला हे कळणारच नाही. रिकाम्या वेळी तुमच्या आवडीचं काम करा. असं काहीतरी करा ज्यातून तुम्हाला ऊर्जा मिळेल. क्रिएटिव्हिटीद्वारे तुम्ही स्वत:ला व्यक्त होण्याची संधी द्या.' मूल्ये मुलांवर थोपवू नका, ती जगायला शिकवा मुलांमध्ये मूल्यं कशी रुजवायची, अशा प्रश्न एका पालकाने विचारला. त्यावर पंतप्रधान म्हणाले, 'मूल्ये ही मुलांवर थोपवण्याची गोष्ट नाही. हे करा, ते करा असं सांगून मुलं ऐकणार नाहीत. तुम्ही कसं वागता त्याचं ती बारीक निरीक्षण करत असतात. म्हणून तुम्ही मूल्ये जगायला शिका तर मुलंही ते शिकतील.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dEMNIR
via IFTTT

Post a Comment

0 Comments