बे पोट्टेहो, ओरिजिनॅलिटी सोडू नका! 'खदखद मास्तर' नितेश कराळेंचा करिअर फंडा

म.टा. प्रतिनिधी, 'स्वत:ची ओरिजिनॅलिटी मी कायम ठेवली. कधीही, कुणासाठी बदललो नाही. स्पर्धा परीक्षेची मुलाखतदेखील बोलीभाषेतच दिली. या वेगळेपणामुळेच आज यशस्वी झालो', असे सांगत '' म्हणून प्रसिद्ध असलेल्या यांनी युवकांना स्वत:ची ओरिजिनॅलिटी न सोडण्याचा सल्ला दिला. 'महाराष्ट्र टाइम्स' नागपूर आवृत्तीच्या नवव्या वर्धापन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम दररोज सुरू आहेत. त्याचअंतर्गत 'फिनिक्स अॅकेडमी'चे संचालक नितेश कराळे यांच्याशी मटा प्रतिनिधी मंदार मोरोणे यांनी बुधवारी दिलखुलास ऑनलाइन संवाद साधला. 'मटा' नागपूरच्या फेसबुक पेजवरून हा कार्यक्रम प्रसारित झाला. यूट्युबवर धुमाकूळ घालणारे कराळे सर स्वत:चा प्रवास उलगडताना म्हणाले, 'वडिलांचे आलुबोंड्याचे दुकान होते. घरात शिक्षणाला अनुकूल वातावरण नव्हते. मीदेखील एक सर्वसाधारण विद्यार्थी होतो. तेव्हापासून इंग्लिशसोबत जुळलेला ३६चा आकडा आजही कायम आहे. दहावीत कसेबसे ६४ टक्के मिळाले. चांगले गुण मिळविणारा विद्यार्थी सायन्स घेत असल्याने मलादेखील अकरावी विज्ञान शाखेत बळजबरीनेच टाकण्यात आले. बारावीत दहावीतील टक्क्यांपेक्षा एक वर्ग पुढे सरकत ६५ टक्के पडले. पुढे बीएससी अंतिम वर्ष चार प्रयत्नात उत्तीर्ण केले. बीएड पूर्ण केले. पंधरा लाख भरले तर नोकरी, अशी स्थिती असल्याने मित्र विशाल वाघ याच्यासह पुण्यात जाऊन स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा निर्णय घेतला. एका वर्षात पाच वेगवेगळ्या परीक्षा दिल्या. परंतु, नेमकी अंतिम वेळी संधी हुकायची. एकदा तर पीएसआयची मुलाखत बाकी असतानाच गावाकडे नित्या पोलिस होणार असल्याची टुम उडाली. त्यावेळीदेखील तोंडघशी पडलो. तेव्हा वर्ध्यात परतलो आणि भावाच्या सल्लाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू केले. चार जणांपासून सुरू झालेल्या क्लासेसमध्ये आता वर्षाकाठी चारशे विद्यार्थी असतात.' वखर घेतलेला बाप आठवतो स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुण्यात सुरू केले असते तर आज कोट्यधीश झालो असतो. पण, मला आजही वखर घेतलेला माझा बाप आठवतो. त्याचे कष्ट स्मरणात असल्यानेच विदर्भातील, आपल्या गावातील मुलांना चांगले मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न असल्याचे कराळे म्हणाले. आपली गाडी अन् माडी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होणे सोपे होते. परंतु, तसे केले असते तर आजसारखा बोलू शकलो नसतो. 'आपलीच गाडी, आपलीच माडी अन् आपल्याच बायकोची गोल गोल साडी' असे ते झाले असते. त्यामुळे अधिकारी होण्याचे स्वप्न सोडून देत ते घडविण्याचे ध्येय डोळ्यापुढे ठेवले. आपल्या केंद्रातून अधिकाधिक आयएएस तयार करण्याचे स्वप्न पाहीले असून एक दिवस ते साकार होणार आहे, हे निश्चित. राजकारणात चांगल्या लोकांची गरज राजकारणात चांगल्या लोकांची गरज आहे. आपण पाहत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी व्यवस्थेत गेल्याशिवाय पर्याय नाही. 'शासन बनविणारी जमात बना' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत. त्यानुसार व्यवस्था बदलविण्यासाठी राजकारण आणि प्रशासनात चांगले लोक यायला हवेत, अशी भावना कराळे यांनी व्यक्त केली. खदखद झाली रात्रभरात व्हायरल लाव्हारसाचा दोन मिनिटांचा व्हिडीओ ओळखीतल्या एका युवकाने टेलिग्रामच्या पीएसआय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर टाकला. तो व्हिडीओ विनोदी शैलीमुळे रात्रभरात व्हायरल झाला. दुसऱ्या दिवशी सकाळपासून फोन खणखणू लागला तेव्हापासून आजतागायत प्रसिद्धीचा आलेख वाढता असून यूट्युबवर अडीच लाख फॉलोअर्स गाठले आहेत, असेही कराळे गुरुजींनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SHGBt6
via IFTTT

Post a Comment

0 Comments