Also visit www.atgnews.com
बारावी परीक्षा रद्द: सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तर, याबाबत राज्य सरकारने संकेतही दिले आहेत. यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रामणेच यंदा कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक प्रवेश परीक्षा घेण्याचे निश्चित केले. त्याचप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणेच पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवीसाठीही प्रवेश परीक्षा होण्याची शक्यता आहे. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि राज्यांतील सर्व विद्यापीठांचे पदाधिकारी यांच्यात प्राथमिक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बारावीची परीक्षा झाली नाही, तर विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश कसा देणार, याबाबत चर्चा करण्यात आली. इंजिनीरिंग, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय शाखांमधील प्रवेश, केंद्रीय; तसेच दर वर्षी होणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. मात्र, पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे. याबाबत विद्यापीठांनी प्रवेश परीक्षेचा पर्याय सुचविल्याचे समजते. आता ही प्रवेश परीक्षा प्रत्येक विद्यापीठाची स्वतंत्र होणार, की राज्यातील सर्व विद्यापीठांसाठी एकच होणार, यावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच, ही परीक्षा शाखानिहाय वेगवेगळी होणार आहे. तसेच, सध्याच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर घेण्यात येईल अशी सूचनाही या बैठकीत करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. प्रत्येक विद्यापीठाची परीक्षा स्वतंत्र पद्धतीने घेण्यात यावी अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. म्हणजे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येणार नाही. बारावीच्या बहुतांश विद्यार्थ्यांचा करिअरचा मार्ग ठरलेला असतो यामुळे त्यांना पदवी आणि विद्यापीठाची निवड करणे सोपे जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गोंधळ अधिक होणार नसल्याचीही चर्चा झाल्याचे समजते. इन हाउस प्रवेशांना प्राधान्य सीनिअर कॉलेजांना जोडलेल्या ज्युनिअर कॉलेजांतील विद्यार्थ्यांना पदवीसाठी इन हाउस कोट्यातून प्रवेश मिळू शकणार आहे. यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचे पदवी प्रवेश होणार आहेत. जे विद्यार्थी बाहेरून कॉलेजांत प्रवेश घेतील त्यांच्यासाठी ही प्रवेश परीक्षा घ्यावी, अशी सूचनाही यात करण्यात आली. यामुळे कॉलेज स्तरावर जागांपेक्षा जास्त अर्ज आले, तर कॉलेज स्तरावर प्रवेश परीक्षेचे आयोजन करावे, अशी सूचनाही काही कॉलेजांनी केली आहे. वाणिज्य शाखेसाठी चढाओढ विज्ञान शाखेतील बहुतांश विद्यार्थी इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेतात यामुळे बीएसस्सीसाठी प्रवेश स्पर्धा तुलनेत कमी असते. मात्र, खरी स्पर्धा ही वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये होणार असल्याचे एका कॉलेजच्या प्राचार्यांनी सांगितले. नामांकित कॉलेजांमध्ये इन हाउस प्रवेश पूर्ण झाल्यानंतर काही थोड्याच जागा शिल्लक राहतात यावर प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे आव्हान असेल असेही प्राचार्य म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yQla9D
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments