खुशखबर! प्राध्यापकांच्या तीन हजारांहून अधिक पदांची भरती

म. टा. प्रतिनिधी, पुणे शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या ३ हजार ७४ जागांची भरती प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. पुण्यात सुरू असलेल्या सेट-नेट आणि पीएचडीधारक उमेदवारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रविवारी ही माहिती दिली. आंदोलकांची भेट घेत सामंत यांनी भरती प्रक्रिया आठवड्याभरात सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयाचे स्वागत करत नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीतर्फे करण्यात येत असलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 'उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून संदर्भातील फाइल वित्त विभागाकडे पाठवण्यात आली आहे. पुढील आठवड्यात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांची स्वाक्षरी झाल्यानंतर भरतीबाबत सविस्तर शासन आदेश काढण्यात येईल. २०२०मध्ये महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या एकूण किती रिक्त जागा उपलब्ध आहेत, याचा सविस्तर अहवाल २ महिन्यांच्या आता सादर करण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांना सांगितले. तो अहवाल आल्यानंतर या रिक्त जागा भरती प्रक्रियेत समाविष्ट करून घेतल्या जातील, असे सामंत यांनी नमूद केले. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या सर्व प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सामंत यांनी रविवारी जाहीर केला. सध्याच्या तुलनेत प्राध्यापकांना त्यांच्या मानधनात २५ टक्क्यांनी वाढ दिली जाईल, असे ते म्हणाले. याबाबत लवकरच शासन आदेश प्रसिद्ध होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. तासिका ही ४८ मिनिटांची असली तरी यापूर्वी ती ६० मिनिटांप्रमाणे गृहीत धरली जात होती. आता त्यातही बदल करण्यात येणार असून एका तासिकेसाठी ४८ मिनिटेच गृहीत धरली जाणार असल्याचेही ते म्हणाले. सीएचबीच्या प्राध्यापकांसाठी समिती तासिका तत्त्वावरच्या प्राध्यापकांना योग्य वेळेत मानधन मिळावे, तसेच त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये संघटनांचे प्रतिनिधी, दोन तज्ज्ञ आणि सहसंचालक यांचा समावेश आहे. येत्या ३ महिन्यांच्या आत तासिका तत्त्वापेक्षा प्राध्यापकांच्या हितासाठी एखादा वेगळा पर्याय तयार करता येईल का, याविषयी सरकार विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xWJjde
via IFTTT

Post a Comment

0 Comments