मुंबई विद्यापीठाच्या ३८ इमारती NOC, OC विना पडून! राज्यपालांची नाराजी

मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसर येथे विविध विभागांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र ना-हरकत प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्राशिवाय त्या वापरात नसल्यामुळे, प्रस्तावातील त्रुटी दूर करून विद्यापीठाला इमारतींचे नाहरकत प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्र यथाशीघ्र देण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महानगरपालिका व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. राज्यपाल कोश्यारी यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसराला भेट दिली व विविध विभाग व इमारतींची पाहणी केली. नॅशनल सेंटर फॉर नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी, ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडीटोरिअम, सेंटर फॉर बेसिक सायन्सेस, परीक्षा भवनाची नवीन इमारत, जवाहरलाल नेहरू ग्रंथालय येथे जाऊन पाहणी केली. विद्यापीठाच्या ३८ इमारती महानगरपालिका व अग्निशमन विभागाच्या ना हरकत व भोगवटा प्रमाणपत्राशिवाय पडून आहेत याबाबत राज्यपालांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. त्यानंतर विद्यापीठातील अधिकारी व पालिका अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी वरील सूचना दिल्या. विद्यापीठातील विविध प्राधिकरणांच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत बांधकाम पूर्ण झालेल्या व वापरात नसलेल्या इमारती यांबाबत देखील सविस्तर माहिती देण्याच्या सूचना राज्यपालांनी विद्यापीठाला दिल्या. विद्यानगरी परिसर येथे मुंबई विद्यापीठातर्फे सुरु असलेले नवीन परीक्षा भवन, ग्रंथालय भवन, आंतर राष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह व नवे मुलींचे वसतिगृह व भावी योजना याबाबत सादरीकरण करण्यात आले. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि प्राधिकरणातील सदस्य उपस्थित होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3y9PtXC
via IFTTT

Post a Comment

0 Comments