अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना भरता येणार 'टीईटी'चे अर्ज

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद डीएड, बीएड अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेसाठी () अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत टीईटी-२०२१ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापासून शिक्षक पात्रता परीक्षा होऊ शकली नाही. दोन वर्षानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये महाटीईटी घेण्यात येणार आहे. यावर्षी फॉर्म ऑनलाइन भरण्याच्या प्रक्रियेमध्ये डीएड आणि बीएड अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना या परीक्षेची संधी देण्यात आलेली नव्हती. मागील प्रत्येक वेळी परीक्षा परिषदने डीएड आणि बीएड शेवटच्या वर्ष धारक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी देण्यात येत होती, परंतु यावर्षी ऑनलाईन अर्जामध्ये तशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. करोनामुळे या अभ्यासक्रमाच्या परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे संधी नाकारण्यात येत असल्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर शासनाने अशा विद्यार्थ्यांना संधी देण्यात येत असल्याचे जाहीर केले. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद धोरणाशी सुसंगत राहून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेस बसण्यास मुभा देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. हजारो विद्यार्थ्यांना संधी.. डीएड आणि बीएड विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा करोनामुळे वेळेवर घेण्यात आलेली नाही आणि त्याचा निकाल लागला नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना महाटीईटी देता येणार नाही आणि त्यानंतर होणारी अभियोग्यता चाचणी ती पण देता येणार नाही, असे सांगत डीएड, बीएएड पात्रताधारक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी तीन ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाच सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाली आहे. त्यात या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3sV4j2T
via IFTTT

Post a Comment

0 Comments