Also visit www.atgnews.com
पुणे महानगरपालिका शाळांमधील पंधरा हजार विद्यार्थी 'गायब'
म. टा. प्रतिनिधी, करोना संसर्ग आणि लॉकडाउनमुळे सुरू झालेल्या ऑनलाइन शालेय कामकाजाचा फटका महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बसला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांचे प्रवेश १५ ते १७ हजारांनी घटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची कुटुंबे पुण्यातील घर सोडून गावी गेल्याने अथवा ऑनलाइन स्वरूपात शिक्षण घेणे शक्य नसल्याने प्रवेश संख्येत घट झाल्याची भीती करण्यात येत आहे. गेल्या वर्षी महापालिकेच्या पहिली ते आठवीच्या शाळांमध्ये सुमारे ९५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. यंदा आठवीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी वगळले तरी, पहिली ते सातवीच्या साधारण १५ ते १७ हजार विद्यार्थ्यांचा ठावठिकाणा अद्याप शिक्षण मंडळाला लागलेला नाही. या विद्यार्थ्यांचे प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत होतील, असा दावा शिक्षण मंडळाकडून केला जात असला तरी, दोन महिन्यांत सर्व विद्यार्थ्यांना कसे शोधणार आणि त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये यंदा खासगी शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाले होते. सुमारे तीन हजार विद्यार्थी खासगी शाळांमधून आले असले, तरी पूर्वीपासून महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी आता सापडेनासे झाले आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत या विद्यार्थ्यांना शोधायचे कसे, असे आव्हान उभे ठाकल्याचे शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पटसंख्या देण्यास टाळाटाळ पालिकेच्या शाळांची पटसंख्या यंदा अचानक कमी झाली आहे. मात्र, त्याविषयीची अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असून, ३० सप्टेंबरनंतरच माहिती दिली जाईल, असे शिक्षणाधिकारी मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. पालिकेच्या अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यात अडचणी येत असल्यानेच विद्यार्थी संख्येत घट झाल्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या 'ट्रेसिंग'चे काय झाले? करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांचे स्थलांतर होईल, तसेच विद्यार्थ्यांचा माग लागणार नाही, याची पूर्वकल्पना शिक्षण मंडळाला यापूर्वीच होती. त्यासाठी विद्यार्थ्यांचे सातत्याने ट्रेसिंग केले जाणार आहे, असे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले होते. तरीही अद्याप १५ ते १७ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश का घेतला नाही, याचे कोणतेही स्पष्टीकरण शिक्षण मंडळाकडे नाही. मटा भूमिका विद्यार्थ्यांची गळती रोखण्याची गरज गेल्या वर्षीच्या तुलनेत पटावर नसलेले विद्यार्थी यंदा शालाबाह्य होण्याचा धोका आहे. त्यांना तातडीने शिक्षणाच्या प्रवाहात आणले नाही तर, या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबण्याचा धोका आहे. १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या असून, दीड महिना झाल्यानंतरही अद्याप अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या नेमक्या कोणत्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतले नाहीत, त्यांच्या काही अडचणी आहेत का, याची माहिती संकलित करून तातडीने त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून लांब गेले, तर ते शिक्षणापासून कायमचे वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा प्राधान्याने शोध घेऊन त्यांचे प्रवेश पूर्ण करण्यासाठी पावले उचलायला हवी. पालिकेच्या शाळांची पटसंख्या ३० सप्टेंबरला कळेल. त्यापूर्वी पटसंख्या सांगता येणार नाही. प्रवेशांचे काम सुरू असून, सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. - मीनाक्षी राऊत, प्रशासन अधिकारी, पुणे महापालिका शिक्षण विभाग
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Cq4aJ8
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments