शाळा सुरू करण्यासंबंधी शिक्षणमंत्री करणार मार्गदर्शन

Reopen: येत्या सोमवारपासून राज्यभरातील शाळा पुन्हा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अशा शाळांशी संबंधित सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी टास्क फोर्सचे सदस्य,शिक्षणतज्ज्ञ व शालेय शिक्षण विभागातील अधिकारी हेदेखील उपस्थित राहणार आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑनलाइन चर्चासत्र होणार आहे. युट्यूब चॅनलवरुन हे सत्र होईल. यामध्ये क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांना देखील उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. १ ऑक्टोबर संध्याकाळी ४ वाजता हे सत्र होणार आहे. यामध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासोबत करोना टास्क फोर्स सदस्य डॉ. समीर दत्तवाई, शिक्षणतज्ञ हेमांगी जोशी, माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे, आदर्श गाव प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार ही मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते आठवी आणि शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला. मात्र, मुंबईतील शाळांसंदर्भातील निर्णय पालिका घेणार होती. त्यानुसार बुधवारी पालिका आयुक्तांनी शहरातील सर्व माध्यमांचे इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, शाळा सुरू करताना राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे सर्व शाळांना बंधनकारक असणार आहे. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी शाळा प्रशासनाने आवश्यकतेनुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवावे. शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शनाचे शाळांना अचूक पालन करायचे आहे. पालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशनने निर्जंतुकीकरण करून घ्यावे, तर अन्य व्यवस्थापनांच्या शाळांनी आपल्या स्तरावर वर्गांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. मुंबईतील शाळा ४ ऑक्टोबरपासून ऑफलाइन सुरू होणार असल्या तरी ज्या विद्यार्थ्यांना शाळेत येणे शक्य होणार नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांना अन्य कार्यातून मुक्त केले जाणार आहे. करोना काळामध्ये अनेक शिक्षकांना करोना ड्युटी लावण्यात आली आहे. यामध्ये शिक्षकांना कोविड सेंटर, रेल्वे स्थानकांवर कोविड लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. तसेच निवडणूक विषयक कामासाठी शिक्षकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3onAqYx
via IFTTT

Post a Comment

0 Comments