कॉलेजांचा मुहूर्त दिवाळीनंतरच; उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या राज्यभरातील शाळा सुरू केल्यानंतर आता कॉलेजे सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी याबाबत संकेत दिले असून, राज्यभरातील ज्युनिअर कॉलेज आणि विद्यापीठ दिवाळीनंतर सुरू करणे विचाराधीन आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय टास्क फोर्स सदस्य आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. कॉलेज सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठाकडून अहवाल मागविण्यात आल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. राज्यभरातील शाळा सुरू झाल्यानंतर आता राज्यातील कॉलेज आणि विद्यापीठ कधी सुरू होणार याकडे लक्ष आहे. या संदर्भात बोलताना सामंत म्हणाले, ‘कॉलेज सुरू करायची वेळ आता आली आहे. या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून प्रत्येक विद्यापीठाकडून कॉलेज सुरू करण्यासंदर्भात अहवाल मागविला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. दिवाळीनंतर तिसरी लाट आली नाही तर कॉलेज सुरू केली जातील.’ ऑनलाइन आणि ऑफलाइनही ‘एआयसीटीईने नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, ऑफलाइन कॉलेज सुरू केल्यानंतर नेमका किती विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा याबद्दल विचारविनमय सुरू आहे,’ अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. तर कॉलेजांबरोबर वसतिगृहांबाबत आराखडा तयार करण्याची सूचना करण्यात आली असून, अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, असे त्यांनी या वेळी सांगितले; तसेच टप्प्याटप्याने वर्ग सुरू केले जातील, असेही ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3afYtAw
via IFTTT

Post a Comment

0 Comments