पुणे विद्यापीठाच्या परीक्षा 'ऑफलाइन'?

म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले ाच्या आगामी सत्र परीक्षा 'ऑफलाइन' पद्धतीने होण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे 'ऑनलाइन' परीक्षेत उत्तीर्ण होऊन भरमसाठ गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी चांगला अभ्यास करावा लागणार आहे. दिवाळीनंतर सुरक्षित नियमांचे पालन करून पूर्ण क्षमतेने महाविद्यालयांमध्ये ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात गेल्या दीड वर्षापासून करोनाचा प्रादुर्भाव असल्याने, विद्यापीठे आणि महाविद्यालये ऑफलाइन शिक्षणासाठी बंद होती. या काळात विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू होते. त्यामुळे या कालावधीत परीक्षादेखील ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. मात्र, गेल्या काही दिवसांत राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, विद्यापीठे आणि महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांनी ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. पुणे विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सत्र परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबत बैठकीत नुकतीच चर्चा केली. त्यानुसार विद्यापीठाच्या सत्र परीक्षा ऑफलाइन घेण्यावर भर देण्याबाबत एकमत झाले आहे. दिवाळीनंतर परीक्षा मंडळाची बैठक होणार असून, त्यामध्ये ऑफलाइन परीक्षेवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे घरी बसून 'एमसीक्यू' पद्धतीने ऑनलाइन परीक्षा देऊन भरमसाठ गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा अभ्यासावर अधिक भर द्यावा लागणार आहे. सामंत यांचेही सूतोवाच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत काही दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आले होते. त्या वेळी सामंत यांनी विद्यापीठांनी ऑफलाइन परीक्षा घेण्यावर अधिकाधिक भर द्यावा, असे सूतोवाच केले होते. त्यानुसार पुणे विद्यापीठाने सत्र परीक्षांचे नियोजन करण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, सत्र परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि पुणे विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एकमत होताना दिसत आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या ८५ टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. साधारण ३५ हजार विद्यार्थ्यांना लशीचा एक डोस झाला आहे. या विद्यार्थ्यांना येत्या काही दिवसांत दुसरा डोस पूर्ण होईल. त्यामुळे दिवाळीनंतर सुरक्षित वावराचे नियम पाळून महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करता येऊ शकतात. त्याचप्रमाणे 'ऑफलाइन' परीक्षाही होतील. त्याचा अंतिम निर्णय़ करोनास्थितीचा विचार करून, परीक्षा मंडळाच्या बैठकीत होईल. - डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मटा भूमिका विद्यार्थीहितासाठी निर्णय घ्या करोनाचा सर्वांत मोठा फटका शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना बसला. त्यांचे सगळे शिक्षणच ऑनलाइन स्वरूपात सुरू झाले. गेल्या वर्षी तर सर्व परीक्षा 'ऑनलाइन' स्वरूपातच झाल्या आणि एकूण सर्वांनाच पुढील वर्षात प्रवेश द्या, अशाच सरकारच्या सूचना असल्याने गुणांची खैरात वाटली गेली. करोनाचा संसर्ग कमी होत असल्याने आता सर्व व्यवहार सुरळीत सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा पूर्वीप्रमाणे 'ऑफलाइन' पद्धतीने घेण्याबाबत सर्वसहमती होताना दिसत आहे. दिवाळीनंतर याचा सर्वंकष विचार करून विद्यार्थी हितासाठी या निर्णयावर शिक्कामोर्तब करावे आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन ऑफलाइन परीक्षांद्वारेच केले जावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GAEJXl
via IFTTT

Post a Comment

0 Comments