सुरक्षित आणि आरोग्यदायी शाळांची एबीसी; शिक्षणमंत्र्यांनी ट्विट केला व्हिडिओ

करोना काळानंतर राज्यातील आठवीपासूनच्या शाळा सोमवार ४ ऑक्टोबर पासून सुरू झाल्या आहेत. शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या असल्या तरी त्या कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आवश्यक खबरदारीसह चालवण्याची जबाबदारी राज्य सरकार, शाळा व्यवस्थापनांना पार पाडावी लागणार आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आरोग्याची एबीसी सांगणारा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या हॅशटॅगसह गायकवाड यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. शाळांमध्ये एका अर्थी नव्याने परतताना मुलांनी, शिक्षकांनी काय काय खबरदारी घ्यायला हवी, जेणेकरून करोनासारख्या संसर्गाला टाळता येईल, याचा वस्तुपाठ या व्हिडिओत घालून दिला आहे. ए ते झेड या इंग्रजी मुळाक्षरांचा त्यासाठी अतिशय कल्पक पद्धतीने वापर करण्यात आला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात एससीईआरटी आणि प्रथम, युनिसेफ, स्माइल फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांना देखील गायकवाड यांनी या ट्विटमध्ये टॅग केले आहे. दरम्यान, राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील आठवीपासूनच्या शाळा सुरू झाल्या आहेत. राज्यातल्या कोविड टास्क फोर्सने हिरवा कंदिल दाखवल्यानंतर शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक आहे. शाळांचे निर्जंतुकीकरण करणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी सर्व खबरदारी शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. हेच सर्व नियम वरील व्हिडिओत समाविष्ट करण्यात आले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oI2t51
via IFTTT

Post a Comment

0 Comments