आरोग्य विभागाच्या परीक्षेत किती उमेदवारांची उपस्थिती? कसा होता पेपर?...जाणून घ्या

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद : हॉल तिकिटांमधील गोंधळ, ऐनवेळी वेळापत्रकातील बदल अशांमुळे चर्चेत आलेली सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ‘ड’ संवर्गातील पदांसाठीची परीक्षा रविवारी अखेर पार पडली. औरंगाबादमधून ६१ परीक्षा केंद्राहून १२ हजार ३७९ उमेदवारांनी परीक्षा दिली. नोंदणी केलेल्यापैकी ३० टक्के उमेदवार परीक्षेला गैरहजर राहिले. प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी ‘क’पेक्षा ‘ड’ची अधिक असल्याचे परीक्षार्थींनी सांगितले. अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली परीक्षा झाल्याने उमेदवारांचे निकालाकडे लक्ष लागले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘ड’ संवर्गातील तीन हजार ४६६ पेक्षा अधिक जागांसाठी परीक्षा घेण्यात आली. आरोग्य विभागाच्या परीक्षा अनेक महिन्यांपासून चर्चेत होत्या. ‘क’ संवर्गातील विविध पदांसाठी २४ ऑक्टोबरला परीक्षा झाली तर ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी रविवार ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा झाली. करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा लांबल्या. त्यासह परीक्षेतील त्रुटींमुळे परीक्षा चर्चेत राहिली. दूरचे परीक्षा केंद्र, चुकीचे हॉलतिकीट यावरून मोठा गोंधळ उडाला होता. ‘ड’ संवर्गातील परीक्षेत एकाच विद्यार्थ्याला अनेक हॉल तिकीट आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे परीक्षेकडे उमेदवारांचे लक्ष होते. औरंगाबाद शहरात रविवारी सुरळीत परीक्षा पार पडली. दोन ते चारदरम्यान शहरातील विविध ६१ केंद्रांवरून परीक्षा घेण्यात आली. परीक्षेतील पूर्वीचे प्रकार लक्षात घेत आरोग्य विभागाने अधिक खबरदारी घेतल्याचे चित्र होते. दुपारी एक वाजेपर्यंत शहरातील सर्व केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या होत्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. औरंगाबाद शहरातून १७ हजार ५८० उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १२ हजार ३७९ उमेदवारांनी परीक्षा दिली. ५ हजार २०१ उमेदवार परीक्षेला गैरहजर होते, अशी माहिती आरोग्य विभागाचे डॉ. पी. एम. कुलकर्णी यांनी दिली. आरोग्य विभागाच्या डॉ. कुलकर्णी, डॉ. मनोहर वाकळे यांच्या पथकाने शहरातील विविध केंद्राला भेटही दिली. निकालाकडे लक्ष आरोग्य विभागातील गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील ६२०५ पदांसाठीची परीक्षा सुरुवातीपासून गोंधळाची ठरली. राज्यभरात नऊ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षेला नोंदणी केली होती. ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. परीक्षा केंद्रासाठी दिलेला प्राधान्यक्रम वेगळा आणि प्रत्यक्षात मिळालेले केंद्र वेगळे, दूरच्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र अशा अनेक प्रकारांमुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती. दोन्ही संवर्गातील विविध पदांसाठीची लेखी परीक्षा झाल्यानंतर आता निकालाकडे लक्ष असल्याचे उमेदवारांनी सांगितले. गट ‘ड’ संवर्गातील प्रश्नपत्रिका चांगली होती. शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी होते. प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक होती. सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजीसह अंकगणित प्रश्न सोडवताना उमेदवारांच्या बुद्धिमत्तेचा कस लागेल, असे प्रश्न होते अशी प्रतिक्रिया परीक्षार्थी गणेश दळवी याने दिली. शहरातील परीक्षा केंद्र- ६१ एकूण नोंदणी केलेले उमेदवार- १७,५८० परीक्षेला उपस्थित उमेदवार- १२,३७९ परीक्षेला गैरहजर उमेदवार- ५२०१


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mseABP
via IFTTT

Post a Comment

0 Comments