कॉलेज, वसतिगृहाबाबत सूचना कधी?

म. टा. प्रतिनिधी, पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील कॉलेज सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतरही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कॉलेज आणि वसतिगृह सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत; तसेच कोणतीही नियमावलीही प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात मंगळवारपासून विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग, कॉलेज आणि वसतिगृहे सुरू होण्याबाबत शंका व्यक्त होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, विद्यापीठे आणि कॉलेज ऑफलाइन शिक्षणासाठी बंद होती. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अनेकांनी लशीचे दोन डोस घेतले आहेत. अशा परिस्थितीतही विद्यापीठे आणि कॉलेज ऑफलाइन शिक्षणासाठी बंद असल्याने, सरकारच्या धोरणावर टीका करण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील विद्यापीठे आणि कॉलेज सोमवारी ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले. मात्र, सोमवारी 'महाराष्ट्र बंद'च्या पार्श्वभूमीवर, पुणे महापालिकेने मंगळवारपासून विद्यापीठे आणि कॉलेज सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील कॉलेजांनी शैक्षणिक संकुलात ऑफलाइन पद्धतीने शिक्षण सुरू करण्याबाबत तयारी सुरू केली आहे, तर शहरातील कॉलेजांमध्ये शिकणाऱ्या परगावातील अनेक विद्यार्थ्यांनी पुणे गाठायची तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत पुणे विद्यापीठाने कॉलेज आणि वसतिगृह सुरू करण्याबाबत अजून कोणत्याही अधिकृत सूचना कॉलेजांना दिलेल्या नाहीत. त्यामुळे प्राध्यापक, प्राचार्य आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पुणे विद्यापीठाने कॉलेज आणि वसतिगृह ऑफलाइन सुरू करण्याबाबत तातडीने सूचना प्रसिद्ध करून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी शैक्षणिक वर्तुळातून होत आहे. उच्च शिक्षण संचालकांकडूनही सूचना नाहीत विद्यापीठाच्या शैक्षणिक विभाग आणि संलग्न कॉलेज ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याबाबत लवकर सूचना प्रसिद्ध करणार आहे, असे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी सांगितले होते. मात्र, पुणे विद्यापीठाकडून अजूनही सूचनांची नियमावली प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे आज, सोमवारी नियमावली प्रसिद्ध होईल का, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आहे. पुणे जिल्ह्यापाठोपाठ राज्यातील कॉलेज सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे; तरीही राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी कोणत्याही सूचना प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या नाहीत. याबाबत डॉ. माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. 'सर्व वसतिगृहे सुरू व्हावीत' पुण्यात ६० टक्के विद्यार्थी इतर शहरांतून येतात. वाढत्या महागाईमुळे खासगी खोल्यांत राहणे विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठ, कॉलेजांसह राज्यातील सर्व वसतिगृहे तातडीने सुरू होण्याची आवश्यकता आहे. समाजिक न्याय व विशेष साह्य विभागाने शासकीय शाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृहे व अनुदानित वसतिगृहे सुरू करण्याचे आदेश गुरुवारी दिले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचे 'स्टुडंट हेल्पिंग हँड'चे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DIUSI3
via IFTTT

Post a Comment

0 Comments