Also visit www.atgnews.com
१०वी, १२वी परीक्षांबाबत राज्य मंडळाचा अद्याप निर्णय नाही
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा दोन सत्रांत घेण्याचा निर्णय जाहीर करून त्याच्या पहिल्या सत्राचे वेळापत्रकही घोषित केले. अशाच प्रकारचा निर्णय काही राज्यांतील शिक्षण मंडळेही घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी अशा प्रक्रियेसाठी कुठलीही पावले उचललेली नाहीत. इतकेच नव्हे, तर परीक्षा नेमकी कशी होणार, याबाबत काहीही सूचना नसल्याने सराव नेमका कसा करायचा, याविषयी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या वर्षी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा झाल्याच नाहीत. त्या वर्षी विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षांतील गुणांच्या आधारे गुणदान करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंडळाने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने दहावी व बारावीच्या परीक्षा दोन सत्रांत घेण्याचा निर्णय घेतला. त्यातील निम्म्या अभ्यासक्रमाची परीक्षा ऑक्टोबरमध्ये, तर उर्वरित अभ्यासक्रमाची परीक्षा मार्च महिन्यात घेतली जाणार आहे. त्यानुसार पहिल्या सत्राचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. सीबीएसईच्या पावलावर पाऊल टाकून इतर राज्यांतील राज्य शिक्षण मंडळेही अशाच प्रकारचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते. महाराष्ट्रातील राज्य मंडळाची परिस्थिती मात्र वेगळी आहे. यंदा राज्यभरात इयत्ता दहावी व बारावीच्या प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळा कशा सुरळीत सुरू झाल्या, असे सांगत आपली पाठ थोपटवून घेणाऱ्या शिक्षण विभागाने दहावी व बारावीच्या परीक्षा नेमक्या कशा होतील याबाबत मात्र अद्याप कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्व जण संभ्रमात आहेत. याबाबत वेळेत मार्गदर्शन न मिळाल्यास आपले विद्यार्थी इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडू शकतील आणि पुढील प्रवेशामध्ये नुकसान सोसावे लागेल, अशी भीती सर्वच संबंधित व्यक्त करीत आहेत. 'नियोजनाबाबत मार्गदर्शन गरजेचे' परीक्षांच्या दिरंगाईसंदर्भात राज्य शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष बसंती रॉय म्हणाल्या की, 'ऑक्टोबर महिना संपत आला आहे. यानंतर दिवाळीच्या सुट्या सुरू होतील. यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा नेमकी कशी होईल हे शिक्षण मंडळाने वेळेत जाहीर करणे गरजेचे आहे.' राज्य मंडळ जुन्या पद्धतीनेच परीक्षा घेणार असेल तर त्याबाबत शाळांना मार्गदर्शन करून अंतर्गत मूल्यमापन किती गुणांचे असेल, लेखी परीक्षेचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, अशी पुस्तीही रॉय यांनी जोडली. '... तर निकालही वेळेत लागतील' गेल्या वर्षी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणदान करण्यात आले, त्याच आधारे यंदा गुणदान होणार असेल तर अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कशी तपासली जाईल याबाबत वेळीच मार्गदर्शन होणे आवश्यक असल्याचे राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे म्हणाले. यंदा अंतर्गत मूल्यमापनाला जास्त प्राधान्य देऊन, ५० टक्के गुणांची लेखी परीक्षा चांगली काठिण्य पातळी ठेवून, बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे होऊ शकते. त्यातून निकालही वेळेत लावणे शक्य होईल, असेही डॉ. काळपांडे म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3G3yL0N
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments