Schools Reopening 2021: शाळा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात

म. टा. प्रतिनिधी, पुणे सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षक आणि कर्मचारी स्वखर्चातून मास्क, सॅनिटायझर, साबण, निर्जंतुकीकरण यंत्रणा आणत आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळांची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांसाठी राज्य सरकारने तातडीची मदत उपलब्ध करावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार चार ऑक्टोबरपासून ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी, तर शहरी भागातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व शाळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक शाळा दीड वर्षांपासून बंद असल्याने, त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासोबतच देखभाल दुरुस्तीची कामे करावी लागत आहेत. राज्य सरकारकडून याबाबत कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने, शिक्षक आणि कर्मचारी स्वखर्चातून सर्व पायाभूत सुविधांची उभारणी करीत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. शैक्षणिक शुल्काची रक्कम पुरेशा प्रमाणात जमा न झाल्याने, राज्यातील खासगी शाळांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिकवण्यासाठी या शाळांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनुदानित शाळांना दर वर्षी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत 'नॉन सॅलरी ग्रँट' मिळते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ही 'ग्रँट' मिळालेली नाही. त्यामुळे शाळांना पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत अडचणी येत आहेत. राज्यातील अनुदानित शाळांना ही 'ग्रँट' मिळाली तरी अनेक शाळांचे प्रश्न सुटतील, असे पुणे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड यांनी सांगितले. शहरात विद्यार्थी संख्या अधिक शहरातील शाळा मोठ्या असून, तेथे विद्यार्थींची संख्या अधिक आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांना एक दिवसाआड किंवा शिफ्टनुसार बोलवावे लागणार आहे. त्याचप्रमाणे एका डेस्कवर एक विद्यार्थी बसेल, याची काळजी घ्यायची आहे. मोठ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांमध्ये मुबलक पाणी आणि साबण ठेवावे लागणार आहेत. या सर्वांसाठी राज्य सरकारने शाळांना मदत केल्यास, अनेक प्रश्न सुटतील, असे मुख्याध्यापकांनी सांगितले. शाळा सुरक्षितपणे सुरू करण्याच्या दृष्टीने 'एससीईआरटी'च्या वतीने आज दुपारी चार वाजता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत ऑनलाइन चर्चासत्र होणार आहे. त्यामध्ये शिक्षक, मुध्याध्यापक, अधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WACK36
via IFTTT

Post a Comment

0 Comments