परदेशी विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाचा ओढा; ३८ देशांचे विद्यार्थी कोल्हापुरात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या कक्षा आता थेट ३८ देशापर्यंत रूंदावल्या आहेत. यावर्षी सातशेहून अधिक परेदशी विद्यार्थ्यांनी या विद्यापीठात प्रवेश घेतल्याने खेड्यातील विद्यापीठ ही ओळख पुसून आंतरराष्ट्रीय विद्यापीठ अशी नवी ओळख निर्माण होत आहे. परदेशी मुलांसाठी खास शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्तीसह वसतीगृह उभारल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यापुरते शिवाजी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. पण गेल्या काही वर्षात त्याच्या कक्षा रूंदावत त्या साता समुद्रापार पोहोचल्या आहेत. गेले तीन वर्षे ५१ परदेशी विदयार्थी येथे शिक्षण घेत असून दोघांनी या विद्यापीठाची पीएच.डी. पदवी घेतली. खेड्यातील विद्यापीठ ही शिवाजी विद्यापीठाची जुनी ओळख पुसून आता आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख तयार होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण, तज्ज्ञ प्राध्यापक आणि विद्यापीठाच्या आवारातलं शैक्षणिक वातावरण यामुळे अनेक परदेशी वविद्यार्थ्यांसाठी आकर्षण ठरत आहे. गेल्या तीन वर्षांपासून परदेशी विद्यार्थ्यांचा शिवाजी विद्यापीठाकडं ओढा वाढला आहे. अकरा देशातील २० विद्यार्थ्यांनी नुकतेच त्यांचे शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे यात पहिल्या परदेशी पपीएचडी धारक विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. इराणचा वर्घा मोखलेशी याने बाल मानसशास्त्र विषयातून पीएच.डी संपादन केली. विद्यापीठात थांबून अभ्यास करणारा वर्घा पहिला परदेशी पीएचडी धारक ठरला. त्याच्याप्रमाणं आणखी १७ पीएच.डीचा अभ्यास करत आहेत. १९ विद्यार्थी पदव्युत्तरचा, तर ७ विद्यार्थी पदवीचा अभ्यास करत आहेत. परदेशी विद्यार्थ्यांच्या निवासासाठी विद्यापीठाच्या आवारातच स्वतंत्र वस्तिगृह तयार केले आहे. नव्या शैक्षणिक वर्षात या वस्तिगृहाचा विस्तार करण्यात येणार आहे. कारण २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी ३८ देशातील साडेसहाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या मुलांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. त्याची जबाबदारी डॉ. ए. व्ही. घुले यांच्याकडे देण्यात आली आहे. सध्या इराकचे सर्वाधिक ३७ विद्यार्थी शिवाजी विद्यापीठात आहेत. तर इराण, बांगलादेश, मोझांबिक, झिम्बाब्वे, अफगाणिस्तान, केनिया, टांझानिया, सिरीया या देशातलेही विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. कॉमर्स, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणिशास्त्र, भूगोल, बायोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स या विषयांकडे परदेशी विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. परदेशी विद्यार्थ्यांना विविध सवलती, सुविधा देण्यात येत असून त्यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या स्वतंत्र वसतीगृहाची क्षमता वाढविण्यात येणार आहे. परदेशी विद्यार्थ्यांमुळं शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जगभरातल्या संस्कृती पाहायला मिळणार आहेत. परदेशी विद्यार्थ्यांमुळे सांस्कृतिक आदान-प्रदान वाढीस लागेल असे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Bt1qst
via IFTTT

Post a Comment

0 Comments