दहावी-बारावी परीक्षांचे शुल्क माफ करण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद करोनाने पालक गमावलेल्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर आर्थिक मदत करावी, अशी मागणी करोना एकल पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. करोनाने राज्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. करोना उपचाराने कर्जबाजारी झालेल्या कुटुंबांपैकी बहुतांश कुटुंबे असंघटित क्षेत्रातील आहे. किमान या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, अशी मागणी समितीने केली आहे. शिक्षण विभागाने करोनाने पालक गमावलेल्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली आहे. 'पहिली ते आठवीपर्यंत पोषण आहार, गणवेष आणि मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नसल्याने शिक्षणाचा खर्च खूप वाढतो. विधवा महिलांना आपल्या मुलांचा खर्च खूप कठीण होते आहे. पाठ्यपुस्तके स्वतः खरेदी करावी लागतात. बहुतांश मुले बालमजुरी आणि बालविवाहाला बळी पडली. त्यामुळे नववी ते बारावीच्या इयत्तेतील विद्यार्थी प्रवाहात टिकून राहण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज वाटते. मुलांना शालेय इतर खर्चासाठी विशिष्ट रक्कम प्रोत्साहनपर म्हणून दिली तर हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील. सर्वच एकल व विधवा महिलांच्या मुलांसाठी शासनाने असा दृष्टिकोन करून परीक्षा शुल्क माफ करावे,' अशी मागणी हेरंब कुलकर्णी यांनी केली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EdM5OZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments