मुंबई, ठाण्यातल्या शाळांमध्ये आजपासून किलबिलाट; कोणत्या नियमांचे करायचेय पालन...वाचा

‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनामुळे मार्च २०२०पासून बंद झालेल्या इयत्ता पहिली ते सातवीच्या आज, बुधवारपासून प्रत्यक्ष सुरू होणार आहेत. शाळेत प्रवेश घेतलेले पण आपली शाळाही न पाहिलेले अनेक विद्यार्थी शाळेत जाण्यास उत्सुक आहेत; तर पालकही पाल्यांना शाळेत पाठविण्यास उत्सुक असल्याचे पालिका शाळांतील शिक्षक सांगत आहेत. मुंबई पालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग आजपासून सुरू होणार आहेत. मुंबई शिक्षण विभागातर्फे सर्व शालेय मुख्याध्यापकांना पत्राद्वारे यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत. मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सुरक्षितपणे शाळा सुरू कराव्यात, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. राज्यात १ डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. त्यानंतर ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या. मात्र, ओमायक्रॉन या विषाणू नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला होता. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण क्षेत्रातून प्राथमिक शाळा सुरू करण्याची आग्रही मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या इतर शहरांमधील शाळांबाबतचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. पुण्यात उद्या, गुरुवार १६ डिसेंबरपासून; तर ठाणे जिल्ह्यातही आजपासूनच शाळा सुरू करण्यात येणार आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेत लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ४८ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी. विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे, अशा सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत. शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल, अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असतील. शिक्षक-पालक बैठकाही शक्यतो ऑनलाइन घ्याव्यात. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत डबा खाण्याची वेळ येऊ नये म्हणून प्रत्यक्ष शाळेसाठी तीन तासांचाच कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पालकांचा संमिश्र प्रतिसाद विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत पाठविण्यापूर्वी पालकांचे संमती पत्रक असणे आवश्यक आहे. यामध्ये ज्यांच्या घरी ऑनलाइन शिक्षणासाठी सर्व सुविधा आहेत, अशा पालकांनी पाल्याला प्रत्यक्ष शाळेत पाठविण्यास नकार दिल्याचे निरीक्षण मुख्याध्यापकांनी नोंदविले आहे. याउलट ज्यांच्या घरी ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा नाहीत. तसेच ज्यांना आपला पाल्य शाळेत गेला, तरच शिक्षण घेऊ शकतो अशा परिसरातील सुमारे ८५ टक्के पालकांनी पाल्याला शाळेत पाठविण्यास संमती दिल्याचेही मुख्याध्यापक सांगतात. काही खासगी शाळांनी, तर पुढील दोन आठवड्यांत सुरू होणारी नाताळची सुट्टी लक्षात घेता शाळा नवीन वर्षातच सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. हे आहेत प्रमुख नियम - दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फूट अंतर ठेवावे. - शाळेमध्ये प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. - वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी. - शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितिच्या पद्धतीचा अवलंब करू नये. - ज्यांना कोणतीही लक्षणे आहेत, अशांना शाळेच्या आवारात प्रवेश देऊ नये. - मुले किंवा शिक्षक आजारी असतील तर त्यांनी शाळेत येऊ नये, आवश्यक नियमांचे पालन करावे. - शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्यांच्या कालावधीत करोनाबाधित आढळल्यास शाळेतील कोविडप्रतिबंधक कृती योजनेचा सखोल आढावा घ्यावा. - शाळांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DUdm7V
via IFTTT

Post a Comment

0 Comments