मुलांना शाळेत पाठवायचे का? शाळांबाबत पालकांच्या मनाची द्विधा स्थिती

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई शहरामध्ये करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नाताळच्या सुटीनंतर सोमवारी ३ जानेवारी रोजी प्रत्यक्ष सुरू होणार की नाही याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र शाळेने आणि अन्य पालकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतल्यास शाळेत पाठविण्यास तयार असल्याचे मत सध्या पाल्याला प्रत्यक्ष शाळेत पाठविणाऱ्या पालकांनी नोंदविले आहे. तर, जे पालक नाताळच्या सुटीनंतर पाल्याला शाळेत पाठवणार होते त्यांनी मात्र थोडे थांबण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, रविवारी रात्री उशिरापर्यंत शिक्षण विभागाकडून कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई, ठाण्यासह काही सीबीएसई अथवा आयसीएसई शाळांनी पुन्हा शाळा ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व माध्यमाच्या शाळा सरकारच्या निर्णयानंतरच आपली भूमिका ठरविणार आहेत. यामुळे आज, सोमवारपासून शहरातील बहुतांश शाळा नियोजित वेळेवर सुरू होणार आहेत. करोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर पालकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पाल्याला शाळेत पाठवायचे की नाही यावरून चर्चा रंगल्या आहेत. यातच काही सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या शाळांनी आज, सोमवारपासून शाळा पुन्हा ऑनलाइन होणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र बहुतांश संस्थांनी शाळा दोन्ही पद्धतीने सुरू ठेवण्याचे ठरविले आहे. दादर येथील साने गुरुजी विद्यामंदिर शाळेतील एका पाल्याचे पालक प्रसाद तुळसकर म्हणाले की, जोपर्यंत सरकारचे आदेश येत नाहीत तोपर्यंत शाळा सुरू राहिल्या पाहिजेत. तसेच सर्व काळजी घेऊन आम्ही मुलाला शाळेत पाठवण्यास तयार आहोत. वेळेत लसीकरण करण्यासही आम्ही तयार आहोत. तर, दीड वर्षाच्या कालावधीनंतर शाळा सुरू झाल्या आहेत. त्या पुन्हा बंद झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती राज्य मुख्याध्यापक महामंडळ प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी व्यक्त केली. सध्या रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. यामुळे आरोग्यमंत्र्यांनी वेळोवेळी स्पष्ट केल्यानुसार जे काही निर्बंध येतील ते पाळले जातील. तसेच आत्तापर्यंत सरकारने जे काही नियम दिले आहेत, त्या सर्वांचे पालन करून शाळा सुरू ठेवण्यास काहीही हरकत नसल्याचेही गणपुले म्हणाले. कॉलेजांबाबत दोन दिवसांनी निर्णय वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील कॉलेज प्रत्यक्ष सुरू ठेवायची की ऑनलाइन करायची याबाबतचा निर्णय दोन ते तीन दिवसांनी परिस्थिती पाहून घेण्यात येणार आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3sRM5B2
via IFTTT

Post a Comment

0 Comments