आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ स्थगित

म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा () आज, सोमवारी (दि. ७ फेब्रुवारी) होणारा एकविसावा दीक्षांत समारंभ स्थगित करण्यात आला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले, की विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाइन पद्धतीने होणार होता. परंतु, राष्ट्रीय दुखवट्यामुळे दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. या कार्यक्रमाची पुढील तारीख अद्याप निश्चित नसून, ती स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व संलग्नित महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राचार्य व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना सूचना द्यावी, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी केले आहे. अमरावती विद्यापीठाची परीक्षा पुढे ढकलली संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील हिवाळी परीक्षेचा ७ फेब्रुवारीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारने सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे. मुंबई विद्यापीठाची परीक्षा लांबणीवर मुंबई विद्यापीठाच्या ( ) दूरस्थ शिक्षण विभागाच्या एम.ए. (MA) आणि एम. कॉमच्या (MCom) परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. गानसम्राज्ञी यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने सोमवारी ७ फेब्रुवारी २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. परिणामी ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आयडॉलच्या एम.ए. आणि एम. कॉम. परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असे विद्यापीठाने कळवले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Q0D8WTY
via IFTTT

Post a Comment

0 Comments