शिका कायदा!

सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांत दिवसागणिक वकिलांची आवश्यकता भासत आहे. विद्यार्थी दोस्तांनो, या क्षेत्रात प्रचंड मागणी असून तुम्हालाही या क्षेत्रात करिअर करण्यात रस आहे का? तर लॉचं शिक्षण देणाऱ्या संस्था, आवश्यक कौशल्य आणि संधी याविषयी जाणून घेऊ या. कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावं लागलं, की सर्वांना गरज पडते ती वकिलांची! खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र; प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलांची आवश्यकता भासत असतेच. फक्त कंपन्या किंवा सरकारी कार्यालयेच नाही, तर वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी याच वकीलमंडळींची मदत घ्यावी लागते. दिवाणी किंवा नागरी आणि फौजदारी गुन्ह्यांमध्ये आपल्या पक्षकाराची बाजू न्यायालयात मांडतात. म्हणूनच आज कायद्याचा अभ्यास केलेल्या पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. कायदेशीर प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा न्यायालयापुढे आपलं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती ही अर्थातच वकील असते. कायद्याच्या क्षेत्रात काम करताना वकिलाकडे कोणत्या ना कोणत्या क्षेत्राचा खास अभ्यास असणं गरजेचं असतं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी एखाद्या क्षेत्रात स्पेशलायझेशन करायला हवं. नागरी, फौजदारी, सायबर, प्रशासकीय, मानव अधिकार, संवैधानिक, कौटुंबिक, रिअल इस्टेट, कॉर्पोरेट, टॅक्सेशन, आंतरराष्ट्रीय, व्यापार, लेबर, बौद्धिक संपदा (इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी)/ पेटंट आदींपैकी एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून स्पेशलायझेशन करता येईल. वकील म्हणून काम करताना (प्रॅक्टिस करताना) स्टेट सेंट्रल बार काऊन्सिलकडे नावनोंदणी करून मान्यता मिळवावी लागते. अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कायदे क्षेत्रातील पदवी मिळवायची तर लॉ कोर्स करायला हवा. यासाठी विद्यार्थ्यांकडे दोन पर्याय आहेत. एक तर कोणत्याही क्षेत्रातील पदवीनंतर तीन वर्षांचा लॉ कोर्स (एलएलबी) करणे किंवा बारावीनंतर पाच वर्षांचा बीए एलएलबी (ऑनर्स) अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन पदवी मिळवता येते. ज्या विद्यार्थ्यांना न्यायालयात कायद्याचे काम (प्रॅक्टिस) करण्याची इच्छा नाही, असे विद्यार्थी दोन वर्षांचा करस्पॉन्डन्स कोर्स करू शकतात. पदवीनंतर (ग्रॅज्युएशन) दोन वर्षांचा बॅचलर ऑफ जनरल लॉ (बीजीएल) किंवा बॅचलर ऑफ अ‍कॅडमिक लॉ (बीएल) हा अभ्यासक्रम करण्याचा पर्याय अशा विद्यार्थ्यांना निवडता येईल. रोजगाराच्या संधी कायद्याची पदवी मिळवलेल्या अर्थात अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या वकिलांना ट्रायल कोर्ट (सत्र न्यायालय), हाय कोर्ट (उच्च न्यायालय), सुप्रीम कोर्ट (सर्वोच्च न्यायालय) आणि कॉझी जुडिशिअल इन्स्टिट्यूशन्समध्ये वकील म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होते. इंडियन लीगल सर्व्हिस (भारतीय कायदेविषयक सेवा) तसेच, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांमध्येही पदवीधर वकिलांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. टीचिंग, कायदेविषयक पुस्तकं/ जर्नल्स/ रिपोर्ट्स यासाठी लेखन आणि संपादन, कायदेविषयक ज्ञानाचे आऊटसोर्सिंग, भारतीय लष्कर, नौदल आणि वायू दलाच्या कायदेविषयक शाखांमध्ये किंवा विविध ट्रस्टवर ट्रस्टी म्हणूनही काम करण्याची संधी प्रशिक्षित वकिलांना मिळू शकते. आज जागतिकीकरणामुळे अनेक व्यवसायधंदे निर्माण झाले आहेत. प्रशिक्षण संस्था गव्हर्मेंट लॉ कॉलेज, मुंबई www.glcmumbai.com एनएलएसआययू, बंगलोर www.nls.ac.in एनएएलएसएआर, हैदराबाद www.nalsarlawuniv.ac.in किशनचंद छेलाराम लॉ कॉलेज, मुंबई www.kclawcollege.com न्यू लॉ कॉलेज, मुंबई कायद्याचं शिक्षण घेत असताना, वकील म्हणून पदवी मिळवताना शक्य होईल तेवढ्या इंटर्नशिप्स करत राहायला हव्यात. यामुळे वकील म्हणून स्वतंत्र काम सुरू करण्यापूर्वीच तुम्हाला या क्षेत्रात कसं काम करायचं, प्रत्यक्ष काम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आदी बाबींची कल्पना येईल. इंटर्नशिप करताना तुम्हाला आपण कोणत्या विषयात स्पेशलायझेशन करायला हवं, याचा अंदाज बांधता येणं शक्य होईल. काही लॉ फर्म्स योग्य उमेदवारांना प्री प्लेसमेंट्स (शिक्षण सुरू असतानाच नोकरीची ऑफर) देतात. एक यशस्वी वकील म्हणून स्वत:ची ‘इमेज’ तयार करण्यासाठी अनेक वर्षांची खडतर तपश्चर्या करायला लागते, त्यामुळे संयम ठेवून आपलं काम सातत्याने करायला हवं. कधीही हार न मानण्याची तुमची वृत्ती तुम्हाला या क्षेत्रात पुढे घेऊन जाईल. मीनाक्षी अय्यर, अद्वैय्या लीगल (पार्टनर)


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/370vqgz
via IFTTT

Post a Comment

0 Comments