अभ्यासाचे 'ऑनलाइन' पर्याय

> आनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक सध्या करोनामुळे जगभर लॉकडाऊन केलेले आहे. त्यामुळे घरातून अभ्यास आणि अन्य कामं करणं अपरिहार्य झालं आहे. टीव्ही आणि मोबाइलवरुन मनोरंजनात्मक कार्यक्रम बघून आता कंटाळा आला असेल. वेगळ्या अर्थानं आपण आपल्या घरामध्ये स्थानबध्द झालो आहोत. कॉलेजांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर काही जणांच्या परीक्षा सुरु झाल्या होत्या तर काही विषयांचे अध्यापन ८० टक्के पूर्ण झाले होते. लॉकडाऊनमुळे परीक्षा कधी होतील हे सांगता येणं कठीण आहे, पण परीक्षा होणार असं गृहीत धरून सराव करणं उचित ठरेल. त्यामुळे आपल्याला ज्या विषयांची परीक्षा द्यायची त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आपल्या विषयाच्या अभ्यासाची तयारी करताना आपण इंटरनेटच्या साहाय्याने आपल्या विषयाशी संबंधित वेबसाइटस, युट्यूब व्हिडीओ, ऑनलाइन अभ्यासक्रम पाहू शकता. याचबरोबर पुढील शिक्षणाच्या वा नोकरीच्या दृष्टीनं उपयुक्त विषयांचा अभ्यास करण्यासाठी हा वेळ सत्कारणी लावता येईल. या काळात आपण कोणकोणत्या आधुनिक संसाधनांद्वारे आणि नावीन्यपूर्ण पध्दतींनी आपलं ज्ञान वृध्दिंगत करु शकतो याचा मागोवा या लेखमालेतून आपण घेणार आहोत. ० स्वयं प्रभा भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत 'स्वयं प्रभा'ची सुरुवात जुलै २०१७ मध्ये करण्यात आली. स्वयं प्रभा हा ३२ मोफत 'डायरेक्ट टू होम' चॅनेल्सचा समूह आहे. याचं प्रक्षेपण जीसॅट-१५ उपग्रहाच्या साहाय्यानं दिवसभर सुरु असतं. रोज चार तासांचे नवीन अभ्याससाहित्य दिवसभरातून पाच वेळा प्रक्षेपित केलं जातं. विद्यार्थी आपल्या सोयीच्या वेळेनुसार हे पाहू शकतात. हे अभ्याससाहित्य देशातील नावाजलेल्या संस्थांतील प्राध्यापक आणि तज्ज्ञांद्वारे तयार केले जाते. यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग, आयआयटी, एनपीटीइएल (नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नोलॉजी एन्हान्स्ड लर्निंग), एनसीईआरटी, कॉन्सोर्शियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन (सीईसी), इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग इ. संस्थांकडून या चॅनेल्सचं अभ्याससाहित्य तयार केलं जातं. उच्च शिक्षण- पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील कला, वाणिज्य, विज्ञान, परफॉर्मिंग आर्ट्स, सामाजिक शास्त्रं आणि मानव्य शास्त्र, इंजिनीअरिंग, टेक्नोलॉजी, लॉ, मेडिकल, कृषी इ. विविध विद्याशाखांमधील पाठ्यक्रमावर आधारित अभ्याससाहित्य उपलब्ध आहे. या अभ्याससाहित्यावर आधारित अभ्यासक्रम स्वयं - SWAYAM (Study Web of Active Learning by Young and Aspiring Minds) द्वारे पूर्ण करुन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील मिळवता येईल. शालेय शिक्षण ( नववी ते बारावीसाठी)- यामध्ये काही अभ्यासघटक हे शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी देखील आहेत. याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या विषयाच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी होतो. तसंच 'नीट' (वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा ) आणि जेईई (मुख्य) , जेईई (अॅडव्हान्स्ड) यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या तयारीसाठी देखील होतो. ज्यांना नवनवीन विषयांचे शिक्षण घ्यायचे आहे अशा देशातील आणि जगात वास्तव्य करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे. अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठीही कार्यक्रम आहेत. - वाहिन्या आणि प्रक्षेपणाचे विषय ० वाहिनी (१ ते ६) कला, सामाजिक शास्त्रं, मानव्य शास्त्रं या संबंधित अभ्यासक्रमांचे कार्यक्रम प्रसारित करतात. ० वाहिनी ७- वाणिज्य, अर्थशास्त्र आणि वित्त यासंबंधी अभ्यासक्रमांचे कार्यक्रम प्रसारित करतात. ० वाहिनी ८, ९, १०- मूलभूत विज्ञानातील अभ्यासक्रमांचे कार्यक्रम प्रसारित करतात. ० वाहिनी ११ ते १८- अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमासंबंधी कार्यक्रम प्रसारित करतात. ० वाहिनी १९- जीवशास्त्र ० वाहिनी २०- रसायनशास्त्र ० वाहिनी २१- गणित ० वाहिनी २२- भौतिकशास्त्र या विषयातील अभ्यासक्रम प्रसारित करतात. हे कार्यक्रम अकरावी- बारावी विज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षांसाठी या वाहिन्या पाहणं उपयुक्त ठरेल. ० वाहिनी २३ ते २६- या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांबाबत कार्यक्रम प्रसारित करतात. ० वाहिनी २७ ते ३०- या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग संबंधित अभ्यासक्रमांचे कार्यक्रम प्रसारित करतात. ० वाहिनी ३१ व ३२- या शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठीचे कार्यक्रम प्रसारित करते. वेबसाइट- वेबसाइटवर प्रत्येक वाहिनीचं वेळापत्रक दिलेलं असतं; त्याप्रमाणे आपण वाहिनीवर कार्यक्रम बघू शकतो. अगोदर प्रक्षेपित झालेले कार्यक्रम वेबसाइटवर अर्काइव्ह्समध्ये उपलब्ध आहेत तेथून पाहू शकता. 'स्वयं प्रभा'चे मोबाइल अॅप देखील आपण डाऊनलोड करुन घेऊ शकता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3a7Rw1Q
via IFTTT

Post a Comment

0 Comments