उन्हाळी सुट्टीतील संस्कार शिबिरांना ब्रेक

म. टा. प्रतिनिधी, नगर दरवर्षी मोठ्या संख्येने होणाऱ्या उन्हाळी संस्कार शिबिरांना यंदा 'लॉकडाउन'मुळे ब्रेक लागला आहे. करोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, आगामी काळातही अशी शिबिरे होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे मुलांना घरातच थांबून सुट्टी एन्जॉय करावी लागणार आहे. अर्थात काही संस्थांनी ऑनलाइन संस्कार शिबिरांचे केलेले प्रयोगही यशस्वी झाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये सुट्टी व संस्कार शिबिरे हे जणू समीकरणच बनले आहे. दिवाळी किंवा उन्हाळी सुट्टीच्या काळात काही मुले नियमित शिबिरांना जात असतात. दरवर्षी वार्षिक परीक्षा संपली की येणारी सुट्टी कशी घालवायची, असा प्रश्न मुलांसह पालकांसमोरही असतो. पूर्वी सुट्टीच्या दिवसांत मामाच्या गावाला किंवा आपल्या स्वत:च्या गावी जाण्याचा तसेच पर्यटनाचा बेत अनेक जण आखायचे. मात्र, हल्ली मामाच्या गावाला किंवा स्वतःच्या गावी जाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे पर्यटनाला जाणेही अनेक जण टाळतात. पर्यायाने मुलांचा वेळ सत्कारणी लागावा, यासाठी कला आणि क्रीडा प्रकारातील विविध शिबिरे पालकांच्या डोळ्यांसमोर येतात. अगदी नृत्य़, गायन, चित्रकला यापासून ते थेट क्रिकेट, बुद्धिबळ, ट्रेकिंग आदी प्रकारची शिबिरे या काळात आयोजित केलेली असतात. सुट्टीमध्ये शिबिरांना मुलांचा मिळणारा प्रतिसाद पाहता, मागील काही वर्षांत व्यावसायिक शिबिरांचे प्रमाणही मोठ्या संख्येने वाढले आहे. पालकही सुट्टीत विरंगुळा म्हणून मुलांना शिबिर; तसेच छंदवर्गांना पाठवतात. अशा शिबिरांमधून अनेक गोष्टी मुले शिकतात. यंदा मात्र 'लॉकडाउन'मुळे या शिबिरांना ब्रेक लागला आहे. दरवर्षी साधारपणे १५ एप्रिलपर्यंत शाळेतील मुलांची परीक्षा संपत असते. त्यानंतर जवळपास १५ जूनपर्यंत सुट्टी असते. यंदा 'करोना'चा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून शाळा मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच बंद करण्यात आल्या आहेत. परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलांना साहजिकच यंदा दरवर्षीपेक्षा जास्त सुट्टी मिळाली आहे. परंतु 'लॉकडाउन' असल्यामुळे मुलांना घराच्या बाहेर जाऊन मैदानावर खेळणे शक्य नाही; तसेच या काळात गर्दी टाळण्यास सांगण्यात आल्याने संस्कार शिबिरांचे आयोजन करणेही शक्य नाही. त्यामुळे यंदा ही शिबिरे होण्याची शक्यताही धूसर झाली आहे. ऑनलाइन घेतले जाताहेत धडे 'लॉकडाउन'च्या काळात घरामध्ये बैठे खेळ खेळण्यास प्राधान्य दिले जात आहे; तसेच अनेक मुले ऑनलाइनच्या माध्यमातूनसुद्धा शिक्षण घेत आहेत. इंग्लिश स्पीकिंग, गणित सोडवण्याच्या सोप्या पद्धती आदी शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यास मुलांकडून प्राधान्य दिले जात आहे. कार्टुन फिल्मसोबतच मुलांकडून ऐतिहासिक, पौराणिक चित्रपट, लघुपट पाहण्यास पसंती दिली जात आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cNTsOF
via IFTTT

Post a Comment

0 Comments