नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ३० एप्रिलपर्यंत स्थगित

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने त्यांच्या प्राध्यापक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देखील ३० तारखेपर्यत वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली आहे. त्यासोबतच विद्यापीठाच्या परीक्षा देखील ३० एप्रिलपर्यंत स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार, राज्य सरकारच्या आदेशानुसार १४ एप्रिलपर्यंत विद्यापीठ, संलग्नीत कॉलेजेस यांच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले होते. तर आता त्या लॉकडाउनला ३० एप्रिलपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग, संलग्नीत कॉलेजेस येथील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना देखील राज्य सरकारचे आदेश आता लागू झाले आहेत. त्यामुळे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी घरातूनच काम करावे, असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, अत्यावश्यक प्रशासकीय कामांकरित पाच टक्के कर्मचारी कॉलेज व विद्यापीठात ठेवता येणार आहे. या निर्णयासोबतच विद्यापीठाने उत्तरपत्रिका तपासणी, मॉडरेशन आणि इतर परीक्षा विषय कामे देखील ३० एप्रिलपर्यंत स्थगित ठेवली आहेत. त्यामुळे परीक्षा विभागात देखील पुढील आदेशापर्यत कोणतेही काम होणार नाही. परीक्षाही लांबणीवर प्रशासकीय कामकाजाप्रमाणेच परीक्षा देखील आता लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. यापूर्वी १४ एप्रिलपर्यंतच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या होत्या. त्यामुळे विद्यापीठाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा झाल्या नाहीत. तर तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा देखील एप्रिल महिन्यातच सुरू होणार होत्या. परंतु, नव्या आदेशाने त्या परीक्षा देखील आता स्थगित करण्यात आल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2RylcPj
via IFTTT

Post a Comment

0 Comments