Also visit www.atgnews.com
'व्यावसायिक शिक्षणासह समुह संशोधनावर भर देणे गरजेचे'
सुप्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेची पहिली ऑनलाईन बैठक आज पार पडली. या बैठकीत कोव्हिड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शिक्षणक्षेत्रावर झालेले परिणाम तसेच कोरोनात्तर परिस्थितीशीचा सामना करताना भविष्यकालीन करावयाच्या उपाययोजनांसाठी तंत्रज्ञानाची मदत घेऊन विद्यापीठास मार्गक्रमण करावे लागणार असल्याची सूचना तज्ज्ञांनी केली. यावर सविस्तर चर्चा करताना इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षणाचा अधिक प्रसार करण्याची गरज अधोरेखित करुन संशोधनाला अधिक चालना देण्यासाठी समुह संशोधनाची कल्पना राबविण्यावर भर देण्यात यावा असेही आजच्या बैठकीत मान्यवरांनी सुचविले. विद्यापीठाच्या शैक्षणिक वृद्धीसाठी मोठ्या प्रमाणावर विद्यापीठ विभागांना स्वायत्ता बहाल करून संशोधन, नाविन्यता आणि उद्योजकता वाढीसाठी सर्वंकष प्रयत्न करावे लागणार असल्याचेही मान्यवरांनी सुचविले. ई-लर्निंग पद्धतीत सुधारणेसाठी शिक्षणतज्ज्ञांचा समुह तयार करण्यात यावा त्याचबरोबर नामांकित शिक्षण संस्थेतील निवृत्त प्राध्यापकांना एडजंक्ट फॅकल्टी म्हणून आमंत्रण देण्यात यावे असेही मान्यवरांनी सुचविले. विद्यापीठातील शिक्षकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यासाठी समितीमार्फत शासनास विनंती करून विद्यापीठातील संशोधनाला चालना देण्यासाठी येत्या बैठकीत विस्तृतपणे चर्चा करण्यात येणार असल्याचेही आजच्या बैठकीत ठरले. पुढील शैक्षणिक वर्षात नव्याने सुरुवात होणाऱ्या शैक्षणिक वेळापत्रकामध्ये महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ऑनलाईन माध्यमातून अध्ययन-अध्यापनाची पद्धती अवलंबविताना घ्यावयाची काळजी तसेच या प्रणालीचे प्रमाण व स्वरूप कसे असावे यावरही चर्चा करण्यात आली. विद्यापीठाच्या उत्कर्षामध्ये माजी विद्यार्थ्यांचे योगदान तसेच त्यांच्या क्षेत्रातील अनुभव आणि नैपुण्यतेचा उपयोग करुन घेण्यासाठी करावयाची कार्यपद्धती अशा विविध बाबींवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. आज पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या या पहिल्या सल्लागार परिषदेसाठी अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांच्यासोबत ख्यातनाम शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, महाराष्ट्र शासनाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, डेटामॅटिक्स समुहाचे अध्यक्ष डॉ. ललित कनोडिया यांच्यासह पदसिद्ध सदस्य म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर व सदस्य सचिव म्हणून प्र. कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी उपस्थित होते. विद्यापीठाच्या जागतिक पातळीवरील संशोधन, नवोपक्रम, नवसंकल्पनांवर भर देऊन देश-विदेशातील चांगली गुणवत्ता आकर्षित करण्यावर गरजाधारीत आणि निकडीच्या क्षेत्रात नविन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी, जागतिक पातळीवर सहकार्य आणि या सर्वांसाठी आवश्यक भौतिक सुविधा तयार करण्यासाठी तसेच समकालीन आणि सद्यस्थितीतील प्रश्नांची उकल करण्यासाठी करावयाची उपाययोजना यावरही विशेष रुपाने चर्चा करण्यात आली. विद्यापीठाची औद्योगिक क्षेत्रांशी सांगड घालताना करावयाची उपाययोजना यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६ अन्वये विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेवर युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा आणि आणि शैक्षणिक औद्योगिक कार्यक्षेत्रातील जागतिक प्रवाहांचा सखोल अनुभव आणि ख्यातनाम उद्योगपती सल्लागार परिषदेचा अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित करावयाची तरतूद असल्याने कुलपती यांनी सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे नामनिर्देशन केले आहे. तर संशोधन व विकास विषयक धोरणे व कृतियोजना यासंबंधात कार्यवाही करणाऱ्या राष्ट्रीय आणि जागतिक संस्थामधील कार्याचा अनुभव असलेले ख्यातनाम शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर आणि महाराष्ट्र शासनाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि डेटामॅटिक्स समुहाचे अध्यक्ष डॉ. ललित कनोडिया, ज्येष्ठ संशोधक डॉ. अशोक मोडक यांना सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. शिक्षण, संशोधन आणि विकास, प्रशासन यासंबंधीचे अहवाल कृतियोजना सादर करून त्याद्वारे कुलगुरूना सल्ला देणे, वित्तीय साधनसंपत्ती व सुशासन निर्माण करणे, त्याचबरोबर विद्यापीठ व्यवस्थेच्या संपूर्ण कामकाजाचे संनियंत्रण करण्यासाठी एक कार्यतंत्र व धोरण निश्चित करणे आणि कार्याचा लेखाजोखा ठेऊन विद्यापीठाची प्रगती आणि त्याच्या कार्यात्मक सक्रियतेचे परिणाम आणि समाजातील त्याची अनन्यता याबाबतची माहिती देणे आणि सुक्ष्म विश्लेषण करुन भाष्य करणे यासाठीही सल्लागार परिषदेचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. आजच्या बैठकीत देशासह विदेशातील परिवर्तीत होणाऱ्या शिक्षण पद्धतीत सर्वानुभवी, परिपक्व अशा महनीय पद्मविभूषण रतन टाटा आणि पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह इतर मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कोव्हिड-१९ नंतरच्या परिस्थितीत उच्च शिक्षणात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी विद्यापीठाच्या पुढील लघु आणि दीर्घ ध्येय-ध्येयधोरण निश्चितीसाठी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच विद्यापीठाच्या जागतिक पातळीवरील संशोधन, नवोपक्रम, नवसंकल्पनांवर भर देऊन देश-विदेशातील चांगली गुणवत्ता आकर्षित करण्यावर गरजाधारीत आणि निकडीच्या क्षेत्रात नविन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी, जागतिक पातळीवर सहकार्य आणि या सर्वांसाठी आवश्यक भौतिक सुविधा तयार करण्यासाठी या सर्व महनीय व्यक्तिंनी बहुमोल मार्गदर्शन केले. - प्रा. सुहास पेडणेकर
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dhwHma
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments