इंजिनीअरिंग, फार्मसी प्रवेश निकष शिथील होणार का? निर्णय अद्यापही प्रलंबित

Engineering Medical Admission 2020 राज्यात इंजिनीअरिंग, फार्मसीच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठीची पात्रता व नियम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (पीसीआय) निकषांप्रमाणे करण्यासाठी निर्णय अजूनही प्रलंबित आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याविषयी ३० जुनला ट्विटद्वारे माहिती दिली होती. मात्र, अजूनही उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून कोणताच निर्णय होत नसल्याने, शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. करोनामुळे उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटू नये, यासाठी राज्यात इंजिनीअरिंग आणि फार्मसी पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी असणाऱ्या गुणांची अर्हता एआयसीटीई आणि 'पीसीआय'च्या नियमाप्रमाणे कमी होणार आहे. त्यामुळे २०२०-२१ वर्षात प्रथम वर्ष इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी 'पीसीएम' ग्रुपला ४५ टक्के गुण, तर फार्मसीच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी 'पीसीबी/एम' गटासोबत बारावी उत्तीर्ण अशी अट होण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्री सामंत आणि विभागाकडूनही माहिती देण्यात आली. मात्र, अजूनही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कागदोपत्री निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे पुढील कोणतीच कार्यवाही शक्य नाही. याउलट इतर राज्यातील राज्य सरकार तसेच नामांकित शिक्षणसंस्था करोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा विचार करून उच्चशिक्षणात आवश्यक ते निर्णय घेत आहेत. त्याचप्रमाणे त्या निर्णयानुसार कार्यवाही सुरू केली गेली आहे. मात्र, महाराष्ट्रात अजूनही व्यवसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश पात्रता, सीईटी अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया, प्रवेश अर्हता, नियमांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास व्यावसायिक शिक्षणाला घरघर लागण्याची शक्यता आहे. तंत्रशिक्षण विभागाची दिरंगाई इंजिनीअरिंग प्रवेशाबाबतची पात्रता 'एआयसीटीई'च्या निकषांनुसार करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे काही दिवसांपूर्वी पाठविला आहे. मात्र, अजूनही त्यावर निर्णय प्रलंबित आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2OYlTzv
via IFTTT

Post a Comment

0 Comments