दहावी निकाल: लाखो विद्यार्थी-पालकांची प्रतीक्षा कधी संपणार?

ssc 10th result 2020: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाला. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या बारावी आणि दहावी या दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे आता केवळ राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल शिल्लक आहे. तो कधी लागणार याकडे लाखो विद्यार्थी पालकांचे डोळे लागले आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल लागण्याआधी काही दिवस दोन्ही निकालांसंदर्भात माहिती दिली होती. त्यानुसार १५ जुलैपर्यंत बारावीचा तर जुलैअखेर दहावीचा निकाल जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे पुढील आठवड्यात दहावीचा निकाल लागणार आहे, मात्र नेमकी तारीख अद्याप बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार या महिनाअखेरपर्यंत निकाल जाहीर होणार आहे. यावर्षी राज्यात दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. संपूर्ण राज्यात परीक्षेसाठी ४ हजार ९७९ परीक्षा केंद्रे आहेत. एकूण २२ हजार ५८६ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नांेदणी झाली आहे. हे सगळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. भूगोलाचा पेपर रद्द कोविड १९ विषाणूच्या संसर्गामुळे मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला. त्यादरम्यान दहावीचा भूगोल विषयाचा पेपर शिल्लक राहिला होता. हा पेपर अखेर रद्द करण्यात आला. विद्यार्थ्यांना या विषयात सरासरी गुण देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. बोर्डाच्या परिपत्रकानुसार, सामाजिक शास्त्रे पेपर - २ या विषयाचे गुणदान हे सरासरीने होणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेत त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी लक्षात घेऊन त्याचे गुणांत रुपांतर करून त्यानुसार गुण दिले जातील. भूगोल विषयाची परीक्षा २३ मार्च २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नियोजित होती; मात्र ती करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. कार्यशिक्षण विषयाचे गुण कसे देणार? दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुणदान त्याने अन्य विषयांच्या लेखी, तोंडी / प्रात्यक्षिक / अंतर्गत मूल्यमापन / तत्सम परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेऊन त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jBYUbO
via IFTTT

Post a Comment

0 Comments